आसाम विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या राज्य युनिटचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी रविवारी औपचारिकरित्या भाजपामध्ये प्रवेश केला. आसाममधील विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मोठा राजकीय बदल मानला जात आहे.
गुवाहाटी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी आसाम भाजप अध्यक्ष दिलीप सैकिया आणि राज्याचे मंत्री जयंत मल्ला बारुआ उपस्थित होते. कार्यक्रमाला पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
पत्रकारांशी संवाद साधताना बोरा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. पक्ष आपल्या मूळ मूल्यांपासून भरकटला असून देशाच्या स्वाभिमानाला पक्षाने लाथाडले आहे, असा आरोप त्यांनी केला. बोरा म्हणाले, “मी ३२ वर्षे काँग्रेसमध्ये काम केले. आज मी जे कपडे परिधान केले आहेत, ते माझ्या रक्ताने माखलेले आहेत. ते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत माखले गेले होते.”
त्यांनी पुढे आरोप केला की काँग्रेसने राष्ट्रीय अभिमानाच्या मुद्द्यांवर तडजोड केली आहे. “मी ३२ वर्षे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काँग्रेसची सेवा केली; परंतु पक्षाने राष्ट्रीय स्वाभिमानाला धक्का दिला आहे. हे मी मान्य करू शकत नाही,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
चार सेमीकंडक्टर युनिट्स लवकरच उत्पादन सुरू करणार
भारत ब्राझिलमध्ये रेअर अर्थचा घसघशीत करार
दहशतवादी मोड्युलचा पर्दाफाश, तामिळनाडू, प. बंगालमधून बांगलादेशी पकडले
एआय समिटमधून ७५ देशांची ‘महायुती
काँग्रेस सोडण्याचा निर्णय अचानक घेतलेला नसून सखोल आत्मचिंतनानंतर घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष आता जनतेच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करत नाही आणि आपल्या विचारधारेच्या पायाभूत तत्त्वांपासून दूर गेला आहे, असा दावा त्यांनी केला.
बोरा यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना दिलीप सैकिया म्हणाले की, त्यांच्या सहभागामुळे आसाममध्ये पक्षसंघटना अधिक बळकट होईल. “भूपेन बोरा यांच्याकडे दीर्घ राजकीय अनुभव आणि संघटन कौशल्य आहे. त्यांच्या प्रवेशामुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास आणि सुशासन पोहोचवण्याच्या आमच्या प्रयत्नांना नवी गती मिळेल,” असे सैकिया यांनी सांगितले.
मंत्री जयंत मल्ला बरुआ यांनीही बोरा यांच्या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की हा निर्णय भाजपच्या धोरणांवर आणि नेतृत्वावर वाढत्या विश्वासाचे द्योतक आहे. “मोठ्या संख्येने लोक भाजपमध्ये सामील होत आहेत, कारण त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनावर आणि आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या विकासाभिमुख कारभारावर विश्वास आहे,” असे ते म्हणाले.







