विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईविरोधात भाजपचा झारखंड बंद

पोलिसांनी विद्यार्थ्याना घेतले ताब्यात

विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईविरोधात भाजपचा झारखंड बंद

झारखंड विधानसभेकडे मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर सोमवारी झालेल्या पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने मंगळवारी राज्यव्यापी बंद पुकारला. बंददरम्यान रांचीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी टायर जाळून रस्ते अडवले. जुन्या विधानसभा भवनापासून नव्या विधानसभा परिसराकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्त्यांनी कांके रोडवरील सीएमपीडीआय गेटजवळ तसेच किशोरगंज, अरगोरा आणि कांके परिसरात रस्ते रोखले. न्यूक्लियस मॉल, हरमू चौक आणि किशोरगंज चौकाजवळ टायर जाळण्यात आले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि जनजीवनावर परिणाम झाला. आंदोलनाच्या ठिकाणांवरील दृश्यांमध्ये पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ झटापट झाल्याचेही दिसून आले.

अभाविप कार्यकर्तेही ताब्यात

बंद अधिक तीव्र होत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जुन्या विधानसभा भवनापासून नव्या विधानसभा परिसराकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना बसमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक जमिनीवर बसले आणि घोषणाबाजी करू लागले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना घेरून पोलिसांच्या वाहनांमधून ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यदिनासाठी दिल्लीत हाय अलर्ट, १९ दहशतावाद्यांचे पोस्टर्स जारी

इराणच्या धमकीमुळे ट्रम्प यांची पळापळ, विमानच बदलले!

फुकेत-दिल्ली विमानातील ऑटोपायलट बंद, हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड

पीओकेमधील हिंसक आंदोलनानंतर पाक सरकार बॅकफूटवर; चर्चेची तयारी

रामगडमध्ये रांची-पाटणा महामार्ग रोखला

झारखंडमधील रामगड जिल्ह्यातही भाजप कार्यकर्त्यांनी रांची-पाटणा महामार्ग म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३३ रोखला.

सकाळीच शेकडो भाजप कार्यकर्ते चार पदरी महामार्गावर जमा झाले. त्यांनी रस्त्यावर बसून हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सुमारे तीन तास महामार्गावरील वाहतूक बंद राहिल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कुजू पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर बंद समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळी ८ ते मध्यरात्रीपर्यंत बंद

झारखंड भाजपने सकाळी ८ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत बंदचे आवाहन केले होते. विधानसभेकडे मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सोमवारी पाण्याच्या तोफा, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि लाठीचा वापर केला होता. त्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदित्य साहू यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईला “अत्याचार” संबोधले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील सरकार बळाचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

रांची आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये बहुतांश शाळा आणि व्यावसायिक आस्थापने बंद राहिली. वाहनांची संख्याही तुलनेने कमी होती. अत्यावश्यक सेवा बंदच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आल्याचे साहू यांनी सांगितले.

‘आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही’

दरम्यान, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थी नेते पीयूष यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे ते स्वागत करतील; मात्र कोणत्याही राजकीय संघटनेचे समर्थन करणार नाहीत.

“आम्ही कोणत्याही विशिष्ट पक्षाचे उघडपणे समर्थन करत नाही. आमच्या समर्थनार्थ कोणी बंद पुकारत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र, विद्यार्थ्यांचा राजकारण किंवा राजकीय पक्षांशी कोणताही संबंध नाही. आम्ही केवळ आमच्या मागण्यांच्या समर्थनार्थ उभे आहोत. आमचा एकच उद्देश आहे — आमच्या मागण्या मान्य करून घेणे,” असे पीयूष यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख गटाची मंगळवारी दुपारी बैठक होणार असून, त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपण केवळ मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशीच चर्चा करू, अशी भूमिका घेतली आहे.

Exit mobile version