“परदेशी भूमीवर राहुल गांधींची ‘भारत बदनाम यात्रा’”

अमेरिकेत जाऊन निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना भाजपाने सुनावले

“परदेशी भूमीवर राहुल गांधींची ‘भारत बदनाम यात्रा’”

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने परदेशात जाऊन भारतावर निशाणा साधत असतात. लोकशाही, तपास यंत्रणा, निवडणूक आयोग यावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत असतात. नुकताच राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या बोस्टनमधील ब्राऊन विद्यापीठाचा दौरा केला. यावेळी त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारतातील निवडणूक प्रक्रियेचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा विशेष उल्लेख केला. त्यांनी एकूणच निवडणूक प्रक्रियेवर टीका केली. यानंतर भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.

राहुल गांधी विद्यापीठात बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाने तडजोड केलेली असून व्यवस्थेत काहीतरी खूप मोठी चूक आहे, असा दावा त्यांनी केला. यावरून भाजपाने राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाचे प्रवक्ते सीआर केसवन यांनी राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले की, “परदेशी भूमीवर ‘भारत बदनाम यात्रा’ या नावाने राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारताच्या संवैधानिक संस्थेवर निंदनीय टीका करत हल्ला केला आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा परदेशात भारताच्या लोकशाहीला कमकुवत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत निवडणूक आयोगावर शाब्दिक हल्ला केला आहे. अमेरिकेत, ते खोटेपणा पसरवत असून निवडणूक आयोगावर टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रणालीचे आणि भारताच्या मतदार नोंदणीचे यापूर्वी कौतुक केले आहे. राहुल गांधी हे अज्ञानी आहेत,” अशा तिखट शब्दात सीआर केसवन यांनी राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहेत.

हे ही वाचा : 

७० हजारांचे हेल्मेट अन् १२ लाखांची स्पोर्ट्स बाईक, उद्योजकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू; काय घडलं नेमकं?

झारखंडमध्ये एक कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षल नेत्यासह आठ नक्षलवाद्यांचा खात्मा

खलिस्तान्यांकडून तिसऱ्यांदा ब्रिटिश कोलंबिया येथील हिंदू मंदिराची तोडफोड

हुथी बंडखोरांवरील हल्ल्याच्या योजना अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी कुटुंबियांसोबत केल्या शेअर?

बोस्टन येथील विद्यापीठात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपेक्षा महाराष्ट्रात जास्त लोकांनी मतदान केले आणि ही वस्तुस्थिती आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी ५:३० च्या सुमारास आकडा दिला आणि संध्याकाळी ७:३० च्या सुमारास दोन तासांत ६५ लाख मतदारांनी मतदान केले, जे अशक्य आहे. आम्ही निवडणूक आयोगाला विचारलं होतं की, मतदान प्रक्रियेची व्हिडीओग्राफी केली जाणार आहे का? त्यावर त्यांनी नकार दिला आणि कायद्यातही बदल केला त्यामुळे तुम्हाला वाटलं, मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ काढू शकत नाहीत. निवडणूक आयोगाने तडजोड केली. निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ आहेत हे अगदी स्पष्ट आहे,” असा दावा राहुल गांधींनी केला.

Exit mobile version