नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवासावर १३० मतदारांची नोंद अशी बातमी अनेक वर्तमानपत्रात झळकली होती. या बातमीचा वोटचोरीचा आरोप करणाऱ्या सर्व विरोधी पक्षांनी आपापल्या भाषणात उपयोग करत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती.
नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर शंभरहून अधिक लोकांची नोंदणी असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यातील एकाचा पत्ता सुलभ शौचालय असल्याचेही म्हटले गेले होते.त्यावरून राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली होती की, काय बसल्या बसल्या सही घेतली काय? सदर प्रकरणाबाबत विविध बातम्या देखील समोर आल्या होता. याबाबत आता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
हे ही वाचा:
सेना प्रमुखांनी युवकांना दिले महत्वाचे धडे
जन सुराज समर्थकाच्या हत्येप्रकरणी जेडीयू उमेदवार अनंत सिंहला अटक
फसवणूक : माजी बँक कर्मचाऱ्यास सीबीआय न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा
लहानपणी साखरेचे सेवन कमी केल्यास मोठेपणी हृदय निरोगी राहते
त्यांनी म्हटले आहे की, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तपत्रांमध्ये नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवासावर १३० मतदारांची नोंदणी अशी बातमी प्रकाशित झालेली आहे. सदर बातमीसंदर्भात मतदार नोंदणी अधिकारी, १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अहवालानुसार ही बाब वास्तवाशी विसंगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदार यादी भाग क्रमांक ३०० मध्ये नेरुळ सेक्टर २१, नेरुळ रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप मार्ग, आयुक्त निवास असे सेक्शनचे नाव नमूद आहे. येथे मनपा आयुक्त निवास हे केवळ विभागाचा (सेक्शन) ठळक ओळखचिन्ह म्हणून नमूद करण्यात आलेले आहे. या यादीभागातील कोणत्याही मतदाराचा पत्तामध्ये / वर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान” असे नमूद नाही. त्यामुळे संबंधित बातमीत नमूद केलेली १३० मतदारांची नोंदणी आयुक्तांच्या निवासावर झालेली आहे, ही माहिती वास्तवाशी विसंगत आहे, असं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे यांनी माहिती दिली.
मतदार यादी भाग क्रमांक १४८ संदर्भात वृत्तपत्रात नमूद करण्यात आलेल्या सुलभ शौचालय विषयक उल्लेखाबाबत तपास करण्यात आला असता, सदर ठिकाण दोन मजली असून पहिला व दुसरा मजला वास्तव्यासाठी वापरात असल्याचे निदर्शनास आले आहे. तेथील मतदार हे या पूर्वी त्या ठिकाणी वास्तव्यास होते, मात्र सध्या त्या तेथून स्थलांतरित झालेल्या असून विहित कार्यपद्धतीनुसार त्यांचे नाव वगळण्याची कार्यवाही सुरु आहे. मतदार नोंदणी अधिकारी, १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अहवालानुसार, वृत्तपत्रात प्रकाशित बातमीत कोणतेही प्रकारचे तथ्य आढळून नाही, असे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले आहे.
