भाजपाचे नेते आणि कांदिवली पूर्वेचे आमदार अतुल भातखळकर यांनी गेली अनेक वर्षे गोरेगाव मागाठाणे व्हाया लोखंडवाला १२० फुटी रस्त्यासाठी पाठपुरावा केला. अखेर त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. या रस्त्यासाठी विधिमंडळ, मुंबई महानगरपालिका अशा वेगवेगळ्या स्तरावर आमदार भातखळकर यांनी सातत्याने अनेक वर्षे पाठपुरावा केला. पण आता या रस्त्याच्या पूर्तीचे श्रेय मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे घेत आहेत. ६ जून रोजी या रस्त्याचे उद्घाटन होत आहे पण त्याचे श्रेय घेतले आहे ते प्रकाश सुर्वे यांनी.
खासदार पियूष गोयल यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यासंदर्भात आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिलेल्या वचनाची पूर्ती झाल्याचेही म्हटले आहे. पण प्रत्यक्षात या रस्त्यासाठी आमदार भातखळकर यांनी अनेक अडचणींना सामोरे जात, त्यातून हा मार्ग सुकर केला आहे.
२०१७पासून अतुल भातखळकर हे या प्रकल्पाच्या पूर्तीसाठी पाठपुरावा करत आहेत. यासंदर्भात झालेल्या एका मुलाखतीत आमदार भातखळकर यांनी या प्रकल्पाला मूर्त रूप कसे आले, याची कहाणी सांगितली आहे.
अभिनेते अभिजित खांडकेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत आमदार भातखळकर म्हणतात की, १९६७च्या विकास आराखड्यात गोरेगाव मागाठाणे रोडचा उल्लेख आहे. ४५ वर्षापूर्वी पश्चिम द्रूतगती महामार्गाला समांतर असा रस्ता वाहतुकीसाठी हवा ही कल्पना करण्यात आली हे महत्त्वाचे. पण तिथे दुर्दैवाने तिथे अतिक्रमणे झाली. मी २०१४ला कांदिवली पूर्वचा आमदार झालो. तेव्हा मी या प्रश्नाला हात घातला. अडचणींचे अनंत डोंगर त्यावेळी या रस्त्याच्या समोर उभे होते. १०-११ वर्षांत आपण या रस्त्याचे काम करू शकलो आहोत.
आमदार भातखळकर म्हणाले की, या रस्त्याच्या कामात प्रशासकीय अडचणी होत्या, राजकीय होत्या, कायद्याच्या होत्या. हा सगळा भाग खासगी वनक्षेत्र म्हणून घोषित होता. तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बैठका केल्या, मग खासगी वन क्षेत्रातून तो भाग बाहेर काढण्यात आला. महिंद्र कंपनी तिथे १९६० सालापासून आहे. त्यांच्या कंपनीतून हा रस्ता जातो. त्यांनी अनेक अटी शर्थी घातल्या. पुढे आनंद महिंद्रा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी आमचे म्हणणे मान्य केले. साडेतीनशे घरेही तिथे आहेत. त्यांचे पुनर्वनस करणे आवश्यक होते आणि ते मोठं आव्हान होतं. महिंद्र कंपनीने जागा दिली. कोणतीही अडचण निर्माण केली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातलं.
२०१४पासून पालिका आयुक्तांच्या भेटी घेतल्या. त्यात अजय मेहता, प्रवीण परदेशी, इक्लाबसिंह चहल, भूषण गगराणी, अश्विनी भिडे यांच्याशी चर्चा केली. त्या बैठकांची जी इतिवृत्ते आहेत, त्यात या रस्त्याचा उल्लेख आहे. रस्ता करताना केवळ डीपी देऊन चालत नाही. कागदावर उतरवणं आवश्यक असतं. महानगरपालिकांकडे पाठपुरावा करावा लागला. २०२२-२३च्या सुमारास माझ्या प्रयत्नांमुळे मुंबई महानगरपालिकेने त्यांचे काही प्रकल्प हे विशेष पायाभूत सोयीसुविधा प्रकल्प घोषित केले. त्यात या प्रकल्पाचा अंतर्भाव केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा विधानसभेत लक्षवेधी मांडली. त्यांनी सकारात्मक उत्तर देताना याला विशेष पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित केलं, असेही भातखळकर म्हणाले.
हे ही वाचा:
सऊदी अरेबियाची नवी समुद्री व्यापार वाट
पंतला संधी, तर ‘या’ युवा खेळाडूवर मोठा विश्वास
गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख राहुल गांधीना रिपोर्ट करतायत?
भातखळकरांनी या रस्त्याचे होणारे फायदे सांगितले. ते म्हणाले की, महानगरपालिकेने तीन टप्प्यात या रस्त्याचं वर्गीकरण केलं आहे. हा रस्ता मागाठाणेपर्य़ंत जातो. दुसरीकडे क्रांतिनगर पासून रत्नागिरी हॉटेलपर्यंत जाईल. दोन वर्षांत तो रस्ताही पूर्ण होईल. पश्चिम द्रूतगतीवरून जे उपनगरात येतील त्यांना या रस्त्याचा फायदा होईल. नियोजनकारांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी १९६७मध्ये ही कल्पना मांडली. पहिल्या विकास आराखड्यात पश्चिम द्रूतगती महामार्गाला समांतर रस्ता विचारात होता. १९९१, २०३४च्या डीपीतही तो आहे. गोरेगावच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांना याचा खूप फायदा होईल. या रस्त्यावर विद्युत तारा, गॅसपाईप लाईन वगैरेसाठी डक्ट (खड्डे) केलेले आहेत. त्यातून महत्वाच्या गॅसलाईन, विद्युत वाहिनी, केबल्स टाकल्या जातात. त्यामुळे रस्ता खोदण्याची गरज नाही.
लोकांच्या या रस्त्याच्या संदर्भात काय भावना आहेत, हे विचारल्यावर ते म्हणाले की, लोक खुश आहेत. माझ्या मतदारसंघात रोज इथे येऊन रस्त्याचं काम पाहतात. दिलेला शब्द पाळत आहात, लोकार्पण करत आहात हे लोक पाहात आहेत. रोड झाल्यावर भागाचा पुनर्विकास होऊ शकेल. या भागातील लोकांना ३०० चौ. फुटांची घरे मिळतील. क्रांतिनगर रत्नागिरी हॉटेलपर्यंतचा रस्ता विकसित झाला की कुरारही विकसित होईल.
भविष्यातील व्हिजनबद्दल ते म्हणतात, जनसामान्यांचे प्रश्न सोडवणं हे माझं काम आहे. महिंद्र कंपनीकडील यलो गेट आहे, तिथून आकुर्लीहून पश्चिम द्रूतगती मार्गावार जाणारा रस्ता होणार आहे. बाणडोंगरीचा डीपी रोड पूर्ण करतो. मालाड कांदिवलीचं कनेक्शन होणार. २०३४च्या डीपीत एक नाट्यगृहाचं आरक्षण केलं आहे. ४ हजार स्क्वेअर मीटरच्या जागेत नाट्यगृह उभारलं जाईल. पाच एकरावर गोपीनाथ मुंडे यांचे नाव असलेले उद्यान विकसित केलेलं आहे.
