महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करत राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात येणार असून यासाठी आजपासून (४ नोव्हेंबर) आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद आणि महानगरपालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात येत आहे. यातून ६८५९ सदस्य निवडून येणार आहेत. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील. एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार प्रभागात अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. जर एखाद्याने जातवैधतेसाठी अर्ज केला असेल तर त्याची पावती लागेल. मतदान केंद्रनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रकाशित होतील. १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
निवडणूक कार्यक्रम-
- अर्ज दाखल करता येणार- १० नोव्हेंबर
- अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर
- अर्जांची छाननी- १८ नोव्हेंबर
- अर्ज माघारी घेण्याची तारीख- २१ नोव्हेंबर
- निवडणुकीसाठी मतदान- २ डिसेंबर
- निकाल- ३ डिसेंबर
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काही विशेष कॅम्पेन घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दिव्यांग मतदार, तान्या बाळासह स्त्रिया, ज्येष्ठांना प्राधान्याने मतदान करु दिले जाईल. तसेच काही मतदार केंद्र गुलाबी केंद्र असणार असून त्यात सर्व अधिकारी या महिला असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच आचार संहितेची ऑर्डर काढली आहे. मद्य आणि पैशाबाबत प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांना मार्गदर्शन केलं असून बँका आणि पतपेढ्या यांच्या व्यवहारावर लक्ष असणार आहे. वाहतुकीवरही विशेष लक्ष असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
हेही वाचा..
म. फुले जनआरोग्य योजना ते चंद्रपुरात अभियांत्रिकी तंत्रनिकेतन! मंत्रिमंडळ बैठकीतले २१ निर्णय
युनूस सरकारने कट्टरपंथीयांसमोर टेकले गुडघे; शाळांमध्ये संगीत, नृत्य शिक्षकांची नियुक्ती रद्द!
मलेशियाच्या समुद्र किनाऱ्यावर राहुल गांधी तृप्त झाले नव्हते म्हणून …
नऊ राज्ये, तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये आजपासून SIR 2.0 ला सुरुवात! कशी असेल प्रक्रिया?
दुबार मतदारांपर्यंत राज्य निवडणूक आयोगाचे कर्मचारी पोहचतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. दुबार मतदारांसमोर डबल स्टार करण्यात आलेले आहेत. असा मतदार केंद्रावर आल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल. त्याला एकाच केंद्रावर मतदान करता येईल असं दिनेश वाघमारे यांनी म्हटलं.
