राजधानी दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात मंगळवारी उशिरा रात्री मोठ्या संख्येने आंदोलकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता मोर्चा काढला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. आंदोलकांनी पोलिसांवर तसेच रॅपिड एक्शन फोर्स (RAF) च्या जवानांवर दगडफेक केली. परिस्थिती चिघळल्यानंतर आंदोलकांनी एका आरएएफ जवानाचा पाठलाग करून त्याच्यावर हल्लाही केला.
कॉकरोच जनता पार्टी (CJP) कडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि कथित ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ही ताजी हिंसक घटना घडली.
पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्यासाठी बळाचा वापर
दगडफेकीनंतर पोलिस आणि सुरक्षा दलांनी बळाचा वापर करून आंदोलकांना तेथून हटवले. पोलिसांनी सांगितले की, आंदोलन आयोजकांनी जंतर-मंतर येथील निश्चित आंदोलनस्थळाच्या बाहेर कोणताही मोर्चा काढण्याची पूर्वपरवानगी घेतली नव्हती किंवा त्याबाबत माहिती दिली नव्हती.
या हिंसाचारानंतर कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात आंदोलकांविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला असून, त्यात दगडफेक, हिंसाचार आणि आरएएफ जवानावर हल्ला केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
लोकशाही नेमकी कुठे,संसदेत की संसदेबाहेर ?
रोहित-कोहलीच्या भवितव्यावर युवराजची फटकेबाजी!
ब्रिटन सरकारमध्ये दोन भारतवंशीय मंत्री
वंचितकडून २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक!
‘चलो संसद’ आंदोलनानंतर पुन्हा तणाव
राजधानीच्या मध्यवर्ती भागातील कनॉट प्लेस परिसरात यापूर्वी ‘चलो संसद’ आंदोलनादरम्यानही मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता.
सोमवारी हजारो आंदोलक संसदेकडे मोर्चा काढत असताना कनॉट प्लेसच्या आऊटर सर्कलमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि अनेक पोलीस वाहनांची तोडफोड केली होती.
हिंसाचारप्रकरणी सहा एफआयआर
दिल्ली पोलिसांनी २० जुलै रोजी झालेल्या ‘चलो संसद’ आंदोलन आणि शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार, तोडफोड आणि इतर घटनांप्रकरणी आतापर्यंत सहा एफआयआर दाखल केले आहेत.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या हिंसाचारामागे मोठ्या गुन्हेगारी कटाचा काही संबंध आहे का, याचाही तपास केला जाणार आहे.
हे गुन्हे पार्लमेंट स्ट्रीट, कनॉट प्लेस आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS), शस्त्र कायदा (Arms Act) आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा यांसह विविध कलमांखाली नोंदविण्यात आले आहेत.
एफआयआरमध्ये आंदोलकांवर बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, हिंसाचार करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे आरोप करण्यात आले आहेत.
दिल्लीत कडेकोट सुरक्षा
सोमवारी झालेल्या हिंसक घटनांनंतर दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
राजधानीतील महत्त्वाच्या ठिकाणी बहुस्तरीय बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. संवेदनशील भाग, प्रमुख सरकारी कार्यालये आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये अतिरिक्त पोलीस व निमलष्करी दलाच्या जवानांची तैनाती करण्यात आली आहे.
