धार्मिक कार्यक्रमांचा वापर करून लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी कथितरीत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी ब्रिटनमधील एका भारतीय वंशाच्या परदेशस्थ नागरिकत्व (ओसीआय) कार्डधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी दिली.
खडक पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी हा मँचेस्टरचा रहिवासी आहे. त्याच्याविरोधात इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऍक्ट, २०२५ आणि नुकत्याच लागू झालेल्या महाराष्ट्र धार्मिक स्वातंत्र्य कायदा, २०२६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ओसीआय कार्डधारकांना प्रार्थना सभांना उपस्थित राहण्याची तसेच विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची परवानगी आहे. “मात्र, आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय त्यांना धार्मिक प्रचार करणे, कीर्तन करणे किंवा धार्मिक प्रवचन देणे शक्य नाही,” असे त्यांनी सांगितले.
प्राथमिक तपासानुसार, आरोपीने नुकतेच गुरुवार पेठेतील एका मराठी चर्चमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तेथे उपस्थित भाविकांशी बोलताना त्याने हिंदू धार्मिक परंपरांशी संबंधित ‘कीर्तन’, ‘संत’ आणि ‘माऊली’ यांसारख्या शब्दांचा वापर केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
सोन्याच्या दरात मोठी झेप; २४ कॅरेट सोने ₹१.५५ लाखांवर
मिल्की मिस्टचा ₹१,५५३ कोटींचा आयपीओ खुला
भारतीयांच्या गृहकर्जाच्या मागणीत मोठी वाढ
स्वातंत्र्यदिनासाठी दिल्लीत हाय अलर्ट, १९ दहशतावाद्यांचे पोस्टर्स जारी
“आरोपीने कथितरीत्या येशूच्या भक्तीचा मार्ग स्वीकारण्याबाबत भाष्य केले. तसेच हिंदू मंदिरे आणि देवतांबाबत गैरसमज निर्माण करणारी वक्तव्ये केली. लोकांची दिशाभूल करून त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा त्यामागे कथित हेतू होता,” असे पोलिसांनी सांगितले.
येशूचे नाव घेतल्याने आजार बरे होऊ शकतात आणि पाऊस पडू शकतो, अशा कथित अंधश्रद्धाजनक दाव्यांचाही त्याने प्रसार केल्याचा आरोप आहे. हिंदू तसेच इतर धर्मीय लोकांना ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे दावे करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.“आम्ही संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे,” असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
