हरियाणातील राज्यसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या कथित क्रॉस व्होटिंग प्रकरणात काँग्रेसने गुरुवार, १६ एप्रिल रोजी मोठी कारवाई करत पाच आमदारांना पक्षातून निलंबित केले आहे. काँग्रेसने शैली चौधरी, रेणू बाला, मोहम्मद इलियास, मोहम्मद इसराईल आणि जरनैल सिंह यांना तात्काळ प्रभावाने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले आहे.
हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राव नरेंद्र सिंह यांनी ही माहिती देताना सांगितले की, नारायणगढ, सढौरा, रतिया, पुनहाना आणि हथीन विधानसभा मतदारसंघांमधून निवडून आलेले आमदार अनुक्रमे शैली चौधरी, रेणू बाला, सरदार जरनैल सिंह, मोहम्मद इलियास आणि मोहम्मद इसराईल यांना पक्षविरोधी कारवायांमुळे निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई प्रदेश शिस्त समितीच्या शिफारशीवर आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या मान्यतेनंतर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी सांगितले की संबंधित आमदारांनी नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान करून गंभीर शिस्तभंग केला, जो संघटनात्मक नियमांच्या विरोधात आहे. राव नरेंद्र सिंह म्हणाले की पक्षात शिस्त सर्वांत महत्त्वाची आहे आणि कोणत्याही स्तरावर शिस्तभंग सहन केला जाणार नाही. तसेच, पक्षाच्या सामूहिक निर्णयांच्या विरोधात कोणतीही कृती केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
आयएसआय समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड; एक जण अटकेत
लष्करचा संस्थापक सदस्य दहशतवादी अमीर हमजावर झाडल्या गोळ्या
लेन्सकार्ट कर्मचाऱ्यांना टिकली, टिळा लावण्यास बंदी? संस्थापकांनी दिले स्पष्टीकरण
“मूल हवे असल्यास पत्नीला पाठव” नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातून धक्कादायक खुलासे
हरियाणामध्ये सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांनी राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रत्येकी एक जागा जिंकली. या निवडणुकीत भाजपचे संजय भाटिया आणि काँग्रेसचे करमवीर बौद्ध विजयी झाले. या निवडणुकीदरम्यान मतदानाच्या गोपनीयतेचे उल्लंघन आणि क्रॉस व्होटिंगच्या तक्रारी समोर आल्या. भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सतीश नांदल यांना पराभव पत्करावा लागला. एकूण ८८ आमदारांनी मतदान केले, तर इंडियन नॅशनल लोकदलचे दोन आमदार अर्जुन चौटाला आणि आदित्य देवीलाल मतदानापासून दूर राहिले.
