मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सध्याच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याप्रकरणी महापौरांनी एफआयआर नोंदवून तातडीने कारवाई करण्याची मागणी पोलिस उपायुक्तांकडे केली आहे.
किशोरी पेडणेकर यांनी महापौरांच्या कार्यालयात धडक देत तिथल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली होती. शिवाय, महापौरांच्या दालनात प्रवेश करून तेथील कागदपत्रांची छायाचित्रे घेत, व्हीडिओ शूटिंगही केले होते. त्यामुळे महापौर रितू तावडे यांनी संताप व्यक्त करत ही मागणी पोलिस उपायुक्तांकडे केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ३ जुलै रोजी माझ्या कार्यालयात घडलेल्या एका गंभीर घटनेबाबत याद्वारे पोलीस यंत्रणेस माहिती देत आहे आणि त्यावर तातडीने कारवाई करण्याची विनंती करत आहे. आज, दिनांक ०३ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या महापालिकेच्या मुख्यालयातील माझ्या कार्यालयात आल्यानंतर कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासूनच त्यांनी व्हिडिओ चित्रीकरण सुरु केले होते. मी माझ्या कार्यालयात उपस्थित नसल्याचे माझ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले. हे ऐकताच त्या संतापल्या. तेथे उपस्थित असलेल्या आकांक्षा मालशे, महापौरांचे खाजगी सचिव, नेहा काबरे, महापौरांचे स्वीय सचिव, अर्चना बेटकर, महापौर/अध्यक्ष, वैधानिक समित्या यांचे स्वीय सहाय्यक, विजय शिंदे, कार्यकारी सहाय्यक, श्रीमती लिना नंदनवार, वरिष्ठ लघुलेखक, गणेश पवार, कनिष्ठ लघुलेखक, कुंदन कुमावत, कनिष्ठ लघुलेखक, राम शिंदे, कनिष्ठ लघुलेखक, कुमारी अंकिता झोडपे, कनिष्ठ लघुलेखक, सचिन शेळके, टेलिफान ऑपरेटर, चंद्रकांत पवार, दुय्यम लिपीक, अजय म्हाब्दी, हविलदार, विनायक कशाळे, शिपाई सर्वांसमोर त्यांनी आवाज चढवून माझ्या कर्मचाऱ्यांवर ओरडा केला. त्यांच्या कोणत्याही पत्राला उत्तर न देण्याचे धाडस मी करू नये आणि हे प्रकरण त्या स्वतः निकाली काढतील, असा इशारा त्यांनी दिला. आत जाऊन माझ्या कार्यालयाची झडती घेईन व व्हिडिओ चित्रीकरण करीन, असे त्यांनी जाहीर केले. माझ्या कर्मचा-यांनी नम्रपणे व स्पष्टपणे त्यांना बळाचा वापर न करण्याची व मी अनुपस्थित असताना माझ्या कार्यालयात प्रवेश न करण्याची विनंती केली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
हे ही वाचा:
राम मंदिरातील देणगी गैरव्यवहारानंतर कर्मचाऱ्यांना ‘नो पॉकेट गाऊन’
मुंबईत मुसळधार; किनारपट्टीला रेड अलर्ट!
अंधेरीतील SRA इमारतीला भीषण आग
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
महापौर तावडे यांनी पुढे म्हटले आहे की, त्यांनी प्रत्येक विनंती दुर्लक्षित केली. त्यांच्या सहका-यांसह आणि त्यांच्याशी समान हेतू बाळगून, त्यांनी बळजबरीने माझ्या कार्यालयात घुसखोरी केली. त्यानंतर त्यांनी आपला मोबाइल फोन काढून कार्यालयाच्या आत व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. चित्रीकरण करत असताना, कार्यालयाच्या टेबलावर पडलेल्या अनेक कागदपत्रांचे त्यांनी जाणीवपूर्वक चित्रीकरण केले. ती कागदपत्रे गोपनीय स्वरूपाची पत्रव्यवहाराची कागदपत्रे आहेत. ती पाहण्याचा, त्यांची छायाप्रत काढण्याचा किंवा त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा अधिकार किंवा परवानगी कोणालाही नाही. मला माझ्या पत्रांबाबत काय कार्यवाही केली हे आतमध्ये आणून दाखवा अशा पध्दतीने धमकी दिली. त्यानंतर, त्यांनी महानगरपालिका सचिवांना माझ्या दालनात बोलावण्यास सांगितले व कागदपत्रे मागवली आणि त्यांना दाखवण्यासाठी त्यांच्या दालनात घेऊन येण्यास सांगितले. महानगरपालिका सचिव माझ्या कार्यालयात आल्यानंतर त्यांनी पत्रे घेऊन श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या कार्यालयात जाण्याबद्दल माझ्या कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार माझे कर्मचारी माझ्या कार्यालयातील कागद पत्रे श्रीमती किशोरी पेडणेकर त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. त्यांनी श्री. मनोज कांबळे, महानगरपालिका सचिव त्यांच्या माध्यमातून माझ्या कार्यालयातील पत्रे मागवून पत्रांची छायाचित्रे काढली.
महापौरांनी या पत्रात म्हटले आहे की, विरोधी पक्षनेता, किशोरी पेडणेकर यांनी माझ्या कार्यालयात येऊन, माझ्या अनुपस्थितीत माझ्या परवानगीविना कागदपत्रांचे छायाचित्र काढले व व्हिडिओ चित्रीकरण केले. हे पूर्णपणे अयोग्य व शिष्टाचाराला धरुन नाही. या कृत्यांद्वारे किशोरी पेडणेकर यांनी दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे केले आहेत. त्यांनी प्रतिबंधित शासकीय जागेत बळजबरीने अतिक्रमण केले. गोपनीय कागदपत्रांचे चित्रीकरण करून त्यांनी शासकीय गोपनीयतेस दिलेल्या संरक्षणाचा भंग केला. ‘पत्रांना उत्तर कोण देते ? पत्रांना उत्तर न देणे ही कामाची पध्दत बरोबर नाही, उत्तर देणार नाही किंवा देणार हे मी महापौरांना विचारणार नाही, तुम्हाला विचारणार, काय काम करता, अशी दमदाटी त्यांनी माझ्या कार्यालयातील कर्मचा-यांना केली. त्यांचे हे वर्तन गुन्हेगारी धमकावणीचे व माझ्या कर्मचा-यांचा आणि महापौरपदाच्या प्रतिष्ठचा जाहीर अपमान करणारे असून, ते त्यांनी आपल्या सहका-यांसह, समान हेतू बाळगून संयुक्तपणे केले.
महापौरांनी म्हटले की, म्हणून माझ्या कर्मचा-यांकडून मिळालेली माहिती पोलीस यंत्रणेसमोर मांडत आहे आणि किशोरी पेडणेकर, विरोधी पक्षनेता व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध वरील गंभीर स्वरूपाच्या दखलपात्र गुन्ह्यांसाठी प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नोंदविण्याची विनंती करत आहे. पुढे, त्यांनी ही कृत्ये पुन्हा करू नयेत किंवा आणखी कोणताही गुन्हा करू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांसह त्यांच्याविरुद्ध आवश्यक ती प्रत्येक कार्यवाही करण्याची मी विनंती करत आहे.
या पत्रासोबत, आम्ही घटनेचा जो भाग चित्रित करू शकलो त्याचे व्हिडिओ चित्रीकरण असलेली एक पेन ड्राइव्ह आपल्या सोयीसाठी सुपूर्द करत आहे. कोणी पुरावा नष्ट करण्यापूर्वी किंवा त्यात फेरफार करण्यापूर्वी तपास तातडीने सुरू करण्याची मी विनंती करत आहे, असेही महापौर तावडे यांनी म्हटले आहे.
