तृणमूल काँग्रेसमधील सुरू असलेल्या सत्तासंघर्षाने शुक्रवारी नाट्यमय वळण घेतले. ऋतुव्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने कोलकात्यातील ईएम बायपासवरील मेट्रोपॉलिटन इमारतीत असलेल्या पक्षाच्या संघटनात्मक मुख्यालयाचा ताबा घेतला.
फिरहाद हकीम, जावेद खान, सांदिपन साहा आणि अखरुझ्झमान यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते संध्याकाळी भाड्याने घेतलेल्या या कार्यालयात पोहोचले. त्यांनी आत बैठक घेतली आणि त्यांचा गटच “खरा” तृणमूल काँग्रेस असल्याचा दावा केला. कार्यालयाबाहेर त्यांनी नवीन फलक लावले. त्यावर ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र होते, तसेच अरुप रॉय यांचा पक्षाध्यक्ष म्हणून ठळक उल्लेख करण्यात आला.
बैठकीनंतर बंडखोर नेत्यांनी कार्यालयाला कुलूप लावले आणि तेथून निघून गेले. त्यानंतर अखरुझ्जमान यांनी पत्रकारांना सांगितले, “आम्हीच खरे तृणमूल काँग्रेस आहोत आणि हे कार्यालय तृणमूल काँग्रेसचे आहे. आम्ही आधीच इमारतीच्या मालकाशी चर्चा केली आहे. हे आमचे पक्ष कार्यालय आहे आणि ते आमचेच राहील. मुख्य प्रवेशद्वाराच्या कुलूपाची चावी आमच्याकडेच राहील. मी नेहमी या कार्यालयात येत होतो. मात्र, निवडणुकांदरम्यान अनेक दिवस येथे आलो नव्हतो. बऱ्याच दिवसांनी येथे आलो आहे. यात काहीही असामान्य नाही.”
फिरहाद हकीम यांनी सातत्यावर भर देत सांगितले की, ममता बॅनर्जी या अजूनही त्यांच्या प्रमुख मार्गदर्शक आहेत आणि कार्यालयात त्यांचे छायाचित्र असणे हेच त्यांच्या गटाच्या वैधतेचे प्रतीक आहे. ऋतव्रत बॅनर्जी यांनीही याला “आमचे पक्ष कार्यालय” असे संबोधले आणि बैठकीतील अधिक तपशील योग्य वेळी जाहीर करण्यात येतील, असे सांगितले.
बंडखोर गटाने कार्यालयाला कुलूप लावून निघून गेल्यानंतर काही वेळातच ममता गटाचे नेते, ज्यात कुणाल घोष यांचा समावेश होता, ते घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे संध्याकाळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
हा घटनाक्रम ऋतव्रत गट आणि ममता बॅनर्जी समर्थक गट यांच्यातील तीव्र संघर्ष आणखी वाढवणारा ठरला आहे. पक्षाच्या निवडणुकीतील पराभवानंतर हा संघर्ष उफाळून आला होता. बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या बंडखोरांनी यापूर्वी विशेष अधिवेशनात ममता बॅनर्जी यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी अरूप रॉय यांची निवड केली होती. मात्र, ममता गटाने ही कारवाई असंवैधानिक असल्याचे म्हणत फेटाळून लावली.
हे ही वाचा:
राम मंदिरातील देणगी गैरव्यवहारानंतर कर्मचाऱ्यांना ‘नो पॉकेट गाऊन’
जोगेश्वरीतील सात मजली इमारतीत मीटर कॅबिनला आग
रोनाल्डोचा ऐतिहासिक विक्रम; विश्वचषकात पुन्हा लिहिला इतिहास!
हा घटनाक्रम ऋतव्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एक दिवस आधी नवी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या पूर्ण खंडपीठाची भेट घेतल्यानंतर घडला. त्या बैठकीत त्यांनी पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि संघटनात्मक रचनेवर दावा केला. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ६ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आपले दावे आणि प्रतिदावे सादर करण्यास सांगितले आहे.
मेट्रोपॉलिटन इमारतीतील हे कार्यालय २०२२ पासून तृणमूल काँग्रेसचे कार्यकारी मुख्यालय म्हणून वापरले जात आहे. ईएम बायपासवरील मूळ पक्ष कार्यालयाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू झाल्यानंतर हे तात्पुरते मुख्यालय करण्यात आले होते. बंडखोर गटाने दावा केला की त्यांनी या इमारतीच्या मालकांशी येथे कार्यालय चालवण्यासाठी करार केला आहे. यापूर्वी इमारतीच्या मालकाने थकित भाडे आणि कालबाह्य झालेल्या करारांबाबत आक्षेप घेतला होता.
विशेष म्हणजे, निवडणुकीच्या निकालानंतर इमारतीचे मालक मॉन्टू साहा यांनी निवडणुकीनंतर संभाव्य हिंसाचाराच्या भीतीमुळे सुरक्षा कारणास्तव पक्षाला दोन महिन्यांच्या आत जागा रिकामी करण्यास सांगितले होते. त्यावेळी पक्ष नेतृत्वाने जागा रिकामी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता पक्षाचे नेतृत्व बदलल्याने परिस्थिती बदलू शकते.
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीतील विजय मिळाल्यानंतर टॉपसिया येथील पक्षाचे कायमस्वरूपी मुख्यालय पाडून त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतला होता. त्यामुळे २०२२ मध्ये मॉन्टू साहा यांची इमारत दोन वर्षांसाठी भाड्याने घेऊन तात्पुरते मुख्यालय तेथे हलवण्यात आले. नंतर कायमस्वरूपी कार्यालयाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने हा भाडेकरार पुढे वाढवण्यात आला.
