ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांशी त्यांनी आक्रमक भाषा वापरत शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे.
गुरुवारी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना काही वादग्रस्त वक्तव्यांबाबत प्रश्न विचारले असता, दिना पाटील यांनी संताप व्यक्त करत पत्रकारांना धमकीवजा इशारा दिला. “पुन्हा इथे आलात तर मारून पाठवेन,” असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच पोलिसांसमोरही आपण हेच सांगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना संजय दिना पाटील यांनी गुरुवारी शिवीगाळ केली. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां*** बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा, अशी अरेरावीची भाषा संजय दिना पाटील यांनी वापरली.
यापूर्वीही दिना पाटील यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर टीका करताना वादग्रस्त भाषा वापरली होती. “माझ्या वाट्याला जाणाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये किंवा स्मशानात पाठवेन,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी माध्यमांवर नाराजी व्यक्त केली. “मी जे बोललो ते उघडपणे बोललो. चौकशी किंवा कारवाई करायची असेल तर ती होऊ द्या, त्याला मी तयार आहे,” असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
चीनच्या भूमीत भारताचा सुवर्ण पराक्रम! महिला रिले संघाचे यश
नसरापूरचा नराधम भीमराव कांबळे दोषी!
एनसीईआरटीच्या नववीच्या पुस्तकात प्रथमच ‘आणीबाणी’वरील स्वतंत्र धडा!
‘संजय दिना पाटील यांनी ठार केलेले ५ लोक कोण?’
दरम्यान, आपला शिवसैनिकांशी कोणताही वैयक्तिक वाद नसल्याचेही दिना पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळेच आपण खासदार झालो असल्याचे सांगत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील काही जुन्या आठवणींचाही उल्लेख केला.
