शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील आणि उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे.
त्यांनी पत्रात म्हटले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब) पक्षातून फुटलेले सहा खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. या फुटीविरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेत कमालीचा संताप असून मतदारांची घोर फसवणूक झाल्यामुळे लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलन करणे, लोकप्रतिनिधीस जाब विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. पण ईशान्य मुंबईतील ‘फुटीर’ खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पाटील म्हणतात. “माझ्या नादाला लागू नका. माझ्याविरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलात पाठवीन.
धमकी देताना ते पुढे म्हणतात, मी याआधी ५ लोकांना ठार केले आहे. (ठार केलेले हे ५ लोक कोण व संजय पाटील यांनी त्यांना कधी व का ठार केले त्याचा तपास व्हावा. आरोपीने स्वतःच कबुली दिल्याने त्यांच्याविरोधात तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल व्हावा.)
हे ही वाचा:
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना समर्पित भारत घडवू
इराणविरोधातील संघर्षात नाटो सहयोगींनी अमेरिकेला निराश केले!
रेल्वेचा सुपरफास्ट प्लॅन! ट्रेन धावणार १६० किमी वेगाने
वैभव सूर्यवंशीसाठी ICCचा खास नियम
“माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन. घरात घुसून मारेन.”
माननीय भारतीजी, खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले असतील तर त्यांच्या घराची त्वरित झडती घ्यावी. त्याकामी दहशतवादविरोधी पथकाची मदत घ्यावी. हे बॉम्ब त्यांना कुणा दहशतवादी टोळीकडून मिळाले असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा मानावा लागेल व दहशतवादी, राष्ट्रविरोधी कृत्यांत सहभागी झाल्याबद्दल त्यांना लगेच यूएपीए खाली अटक होणे गरजेचे आहे.
त्यांची सर्व वक्तव्ये दहशतवाद, गुन्हेगारी कृत्यात सहभागी होण्याचे पुरावे आहेत. त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई व्हावी, अन्यथा मला जनतेच्या सुरक्षेसाठी न्यायालयात दाद मागावी लागेल. खा. पाटील यांच्या धमकीमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे. या काळात एखाद्या राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला झाला अथवा खून झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संजय पाटील यांच्यावर राहील, हे मी इथे खास नमूद करतो, असेही राऊत यांनी म्हटले आहे.







