केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर जोरदार टीका केली आहे. केरळमधील तिरुवल्ला येथे झालेल्या सभेत त्यांनी विरोधकांवर “खोट्यांची फॅक्टरी” चालवण्याचा आरोप करत राजकीय वातावरण तापवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि डावे पक्ष सातत्याने चुकीची माहिती पसरवत आहेत. ‘केरळ फाइल्स’, ‘काश्मीर फाइल्स’ आणि ‘धुरंधर’ यांसारख्या विषयांवर त्यांनी या पक्षांनी खोटं बोलल्याचा आरोप केला. तसेच, एफसीआरए (Foreign Contribution Regulation Act), युनिफॉर्म सिव्हिल कोड (Uniform Civil Code) आणि सीएए (Citizenship Amendment Act) यांसारख्या मुद्द्यांवर लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.
हे ही वाचा:
गोवंडीत अल्पवयीनाचे अपहरण; जबरदस्तीने भीक मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार, ‘गुरू माँ’वर गुन्हा
मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी ३.३७ कोटींचे १५४१ मोबाईल मूळ मालकांना परत
पश्चिम आशियातील तणावामुळे दुबई रिअल इस्टेट बाजारात घसरण
राघव चढ्ढा म्हणाले, घायल हूं इसलीए घातक हूं
मोदी यांनी पुढे सांगितले की, काँग्रेस आणि डाव्यांची राजकारण करण्याची पद्धत देशाच्या हितासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषतः पश्चिम आशियातील (गल्प देशांतील) तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत गैरजबाबदार वक्तव्ये केली जात असल्याचा त्यांनी आरोप केला. अशा विधानांमुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांचे जीव धोक्यात येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
इराणसंबंधित तणाव आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे आधीच परिस्थिती संवेदनशील असताना, विरोधकांनी केलेल्या वक्तव्यांमुळे अनावश्यक भीती आणि गोंधळ निर्माण होतो, असे मोदी म्हणाले. केंद्र सरकार मात्र या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून भारतीयांच्या सुरक्षेसाठी काम करत असल्याचा त्यांनी दावा केला.
या भाषणात मोदी यांनी काँग्रेस आणि डावे पक्ष एकमेकांचे “बी-टीम” असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले की, हे दोन्ही पक्ष बाहेरून विरोध करत असले तरी प्रत्यक्षात एकाच विचारसरणीवर काम करत आहेत. त्यामुळे केरळच्या जनतेने या दोन्ही आघाड्यांपासून सावध राहावे, असे त्यांनी आवाहन केले.
दरम्यान, केरळमध्ये ९ एप्रिल २०२६ रोजी विधानसभा निवडणुका होणार असून, एलडीएफ, यूडीएफ आणि एनडीए यांच्यात तिरंगी लढत आहे. राज्यात पारंपरिकरित्या काँग्रेस-नेतृत्वाखालील यूडीएफ आणि सीपीआय(एम)-नेतृत्वाखालील एलडीएफ यांच्यातच मुख्य लढत होत आली आहे, मात्र भाजपही आता तिसऱ्या पर्याय म्हणून स्वतःला उभं करण्याचा प्रयत्न करत आहे.
एकूणच, केरळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून, राष्ट्रीय मुद्द्यांपासून परराष्ट्र धोरणापर्यंत अनेक विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढताना दिसत आहे.







