फाळणीच्या उद्ध्वस्त कालखंडाचे मोदींनी केले स्मरण!

‘विभाजन विभीषिका स्मृती दिन

फाळणीच्या उद्ध्वस्त कालखंडाचे मोदींनी केले स्मरण!

स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाच्या एक दिवस आधी, ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून फाळणीच्या काळातील हृदयद्रावक आठवणींना उजाळा दिला. या भीषण काळातून बाहेर पडून देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान देणाऱ्या सर्व देशवासीयांना त्यांनी मनापासून नमन केले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही फाळणीमध्ये प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.

१४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यात लाखो हिंदूंची कत्तल झाली. असंख्य हिंदू पाकिस्तानातून भारतात आले. आपले सर्वस्व सोडून ते भारतात एका निर्वासितांसारखे ते राहिले. त्यातूनही अनेकांनी शून्यातून आपले विश्व निर्माण केले. त्या आठवणी आजही खोल जखमा करतात. तो दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिन म्हणून स्मरण केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले, “आज आपण ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ पाळत आहोत. फाळणीमुळे प्रभावित झालेल्या सर्व नागरिकांच्या धैर्याचे आपण स्मरण करतो. हा इतिहासातील असा काळ होता, ज्याने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त केले, कुटुंबे विस्कळीत झाली, अनेकांनी आपले प्रियजन गमावले आणि मोठ्या वेदना सहन केल्या.”

हे ही वाचा:

भूकंपग्रस्त कोलंबियाला भारताचा मदतीचा हात

अभिषेक पोरेलच्या जामीन अर्ज फेटाळत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आशिया कपआधी दीप्तीचा गेमप्लॅन तयार

मुंबई विमानतळावर वृद्ध दांपत्याला लुटले

‘लोकांनी शून्यातून पुन्हा उभे केले आयुष्य’

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, या संकटातून सावरताना अनेकांनी शून्यातून पुन्हा आपले जीवन उभे केले, आव्हानांचे रूपांतर यशात केले आणि देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले. त्यांच्या जीवनप्रवासातून मानवी जिद्दीची ताकद दिसून येते. हा दिवस देशातील परस्पर सौहार्द आणि बंधूभाव कायम राखण्याच्या आपल्या संकल्पाला अधिक बळ देणारा ठरावा, अशी प्रार्थना त्यांनी केली. तसेच सर्वांनी मिळून ‘विकसित भारत’ घडविण्याच्या दिशेने काम करावे, असे आवाहन केले.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी विभाजनाच्या काळातून बाहेर पडून देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान देणाऱ्या नागरिकांना नमन केले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य आणि सामर्थ्याच्या जोरावर संकल्प पूर्ण करता येतात, हे या नागरिकांनी दाखवून दिल्याचे सांगितले. तसेच सद्भावना आणि एकजुटीची राष्ट्रीय भावना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

अमित शहांनी आठवला शोकांतिकेचा काळ

गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, “१४ ऑगस्ट १९४७ हा इतिहासातील एका अत्यंत क्रूर अध्यायाचा साक्षीदार होता. या काळात लाखो लोकांना अमानुष वेदना सहन करत आपले प्राण गमवावे लागले, तर कोट्यवधी लोकांना आपली घरे, संपत्ती आणि प्रियजन सोडून विस्थापित व्हावे लागले.”

अमित शाह यांनी पुढे म्हटले की, ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त मोदी सरकार या शोकांतिकेच्या आठवणी तरुण पिढीपर्यंत पोहोचवत आहे, जेणेकरून देशाला पुन्हा विभाजित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना कधीही यश मिळू नये.

राजनाथ सिंह यांनीही वाहिली श्रद्धांजली

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो, ज्यामुळे लाखो कुटुंबांच्या जीवनात दुःख, विस्थापन आणि अनिश्चितता निर्माण झाली. हा दिवस केवळ इतिहासातील वेदनादायी अध्यायाचे स्मरण करण्याचा दिवस नसून, घर, कुटुंब, संपत्ती आणि प्रियजन गमावल्यानंतरही आयुष्य पुन्हा उभे करण्याचा संकल्प करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या संघर्ष, धैर्य, त्याग आणि जिद्दीचेही स्मरण करून देतो, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.

Exit mobile version