कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मार्चनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीट पेपर लीकवर प्रतिक्रिया दिली आहे. पीएम मोदींनी एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले की, ‘युवकांच्या भविष्याशी खेळ करू देणार नाही. पेपर लीकच्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. पेपर लीक हा राजकारणाचा विषय नाही. त्यांच्या भविष्याचे नुकसान होऊ नये, म्हणूनच री-एग्झाम (पुनर्परीक्षा) घेण्यात आली आणि ती यशस्वीपणे पूर्ण केली. पेपर लीक प्रकरणात सरकारकडून तत्काळ कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांबाबत सरकार संवेदनशील आहे.’
https://x.com/ani_digital/status/2079439496362479632
पीएम म्हणाले की, हा फक्त केंद्र सरकारचा विषय नाही. पेपर लीकच्या दोषींना शिक्षा देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे लागेल. पुढे असे घडू नये, यासाठी व्यवस्था करू. जेव्हा पेपर लीकची बातमी समोर आली, तेव्हा सरकारने तत्काळ कारवाई करत १३ जणांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी नीट पुनर्परीक्षेला प्राधान्य देण्यात आले आणि ही पुनर्परीक्षा यशस्वीपणे पार पाडून तिचा निकाल जाहीर करण्यात कोणताही विलंब केला गेला नाही. भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी अत्यंत कडक पावले उचलण्यात आली आहेत.
पेपर लीकच्या धंद्यात जे लोक लिप्त आहेत आणि दोषी आढळल्यामुळे ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्वोच्च दर्जाच्या वकिलांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. जेणेकरून पेपर लीकसारखे पापकृत्य करणाऱ्यांना कडक शासन मिळेल. पुढे असा पेपर लीक रोखण्यासाठी उचललेल्या ठोस पावलांची माहिती देताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, हा केवळ एका राज्याचा किंवा फक्त केंद्र सरकारचा विषय नाही, तर संपूर्ण देशाचा विषय आहे. देशातील ज्या ज्या राज्यात पेपर लीक प्रकरणात लोक लिप्त आहेत, ज्यांनी हे घाणेरडे पापकृत्य केले आहे, त्यांना शिक्षा देण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.
हे ही वाचा:
युक्रेन जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू
जंतर-मंतरवर राजकारण, नीट देणारे खरे विद्यार्थी मात्र अभ्यासात!
विराट कोहलीच्या एका सल्ल्याने बदलले पी. व्ही. सिंधूचे आयुष्य
हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशाचा आणि तरुणांच्या भविष्याचा विषय आहे. त्यामुळे युवकांच्या भविष्याशी कोणीही खेळ करू नये यासाठी कडक पावले उचलून दोषींना शिक्षा दिली पाहिजे आणि एक दोषरहित परीक्षा यंत्रणा तयार करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र काम केले पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले असल्याची माहिती आज (मंगळवारी) पार पडलेल्या एनडीए संसदीय पक्षाच्या ‘मंगल मिलन’ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
