जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कोक्रॉच जनता पार्टीच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावर आम्ही काय दहशतवादी आहोत का म्हणणारे ‘विद्यार्थी’ दगड, तलवारी, लाठ्याकाठ्या, कुकरी घेऊन उतरले. त्यांनी पोलिसांवर हल्ला करत दोन एसीपीसह अनेक पोलिसांना जबर जखमी केले.
कोक्रॉच जनता पार्टी (CJP) शी संबंधित आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये बुधवारी संध्याकाळी जंतर-मंतर परिसरात पुन्हा हिंसक संघर्ष झाला. या घटनेत दोन सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP), दोन निरीक्षक (इन्स्पेक्टर) आणि एका अन्य पोलीस कर्मचाऱ्यासह अनेक पोलीस जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच रॅपिड ऍक्शन फोर्स (RAF) आणि दिल्ली पोलिसांनी मर्यादित बळाचा वापर करत अश्रुधूराचे गोळे डागून जमावाला पांगवले.
दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, संध्याकाळी सुमारे ८.३० वाजता कनॉट प्लेसमधील टॉलस्टॉय मार्गाजवळ हिंसाचार उसळला. “काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगड आणि बाटल्यांनी हल्ला केला,” असे पोलिसांनी म्हटले आहे. या हल्ल्यात कनॉट प्लेस विभागाचे एसीपी विवेक भगत जखमी झाले. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. “काही मिनिटे परिस्थिती तणावपूर्ण होती, मात्र आता शांतता प्रस्थापित झाली आहे,” असे पोलिसांनी सांगितले.
दगडफेक आणि बाटल्यांचा मारा
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, जंतर-मंतर येथे जमलेले आंदोलक टॉलस्टॉय मार्गाकडे निघाले. तेथे आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी दिल्ली पोलीस आणि आरएएफच्या जवानांवर दगडफेक आणि बाटल्यांचा मारा केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीला आंदोलकांना शांततेने पांगण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सीजेपीचे नेते आणि आयोजकांनाही घटनास्थळी बोलावून जमावाला शांत करण्यास सांगितले. मात्र, आंदोलकांनी स्वतःच्या आयोजकांचेही आवाहन ऐकले नाही, असा दावा पोलिसांनी केला.
हे ही वाचा:
काँग्रेसची उफराटी तऱ्हा; दिल्लीत विद्यार्थ्यांचे समर्थन, केरळात लाठीमार
भारतासाठी इशारा; झिम्बाब्वेने नवं अस्त्र बाहेर काढलं!
सगळ्यांच्या पायात एकच काटा ठसठसतोय…
हेटमायर-रदरफोर्डची तुफानी फटकेबाजी
दगड, काठ्या, तलवारी आणि कुकरी
हिंसाचार वाढल्यानंतर सुरक्षा दलांवर मोठ्या दगडांचा वर्षाव करण्यात आला. काही आंदोलकांकडे काठ्या, तर काहींकडे तलवारी आणि कुकरी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
यानंतर आरएएफ आणि दिल्ली पोलिसांनी मर्यादित बळाचा वापर केला आणि दोन ते तीन अश्रुधूराचे गोळे डागून परिसर रिकामा केला.
पोलीस कर्मचाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दावा केला की, आंदोलक आणि सुरक्षा दलांमधील हा सलग तिसऱ्या दिवसाचा संघर्ष होता. संध्याकाळच्या वेळी समाजकंटक आंदोलनात सहभागी होत असून त्यामुळे तणाव वाढत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी असा आरोपही केला की, हिंसक जमावाने एका पोलीस कर्मचाऱ्याला चारही बाजूंनी घेरून जमावाकडून ठार मारण्याचा (लिंचिंग) प्रयत्न केला. त्याच्यावर वारंवार हल्ला करण्यात आला तसेच त्याला शिवीगाळ करून इतरांना हल्ल्यासाठी चिथावणी देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.
या हिंसाचारानंतर आरएएफ आणि दिल्ली पोलिसांनी मर्यादित बळाचा वापर करत अश्रुधूराचे गोळे डागले आणि परिसर रिकामा केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून जंतर-मंतर आणि आसपासच्या रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तटस्थ ठिकाणीच चर्चा करण्याची सीजेपीची भूमिका
दरम्यान, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कोक्रॉच जनता पार्टीने केंद्र सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असली, तरी ती कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात नव्हे, तर तटस्थ ठिकाणीच होईल, अशी भूमिका पुन्हा स्पष्ट केली.
यापूर्वी दिवसभर जंतर-मंतर येथे पत्रकारांशी बोलताना सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी पक्षाला केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा त्यांच्या निवासस्थानी चर्चा करू इच्छित असल्याची माहिती दिली होती.
मात्र, सीजेपीने हा प्रस्ताव नाकारत, मंत्र्यांनी लोकांमध्ये येऊन आंदोलकांशी चर्चा करावी, असे सांगितले. त्याचबरोबर, सुरक्षा कारणास्तव गरज असल्यास आंदोलनस्थळाजवळील एखाद्या तटस्थ ठिकाणी चर्चा करण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.







