कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनात काल शबाना आझमी यांची एण्ट्री झाली. योगेंद्र यादव यांच्यासोबत त्या जंतर-मंतरवर दाखल झाल्या. आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांची नावे पाहिली, तर या सगळ्यांमध्ये एक समान दुवा आहे. हे सगळे एक तर एनजीओ चालवत आहेत किंवा अशा एनजीओंशी संबंधित आहेत, ज्यांच्याकडे एफसीआरए (FCRA) परवाना आहे आणि ज्यांना परदेशातून मोठ्या देणग्या येत आहेत. अशी सगळी मंडळी आता ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनात सहभागी झाली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. अभिजित दीपकेने उपोषण सुरू केले आहे. पंजाबमधून शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले, पण त्यांना हरियाणा सीमेवर रोखण्यात आले. थोडक्यात सांगायचे तर, आंदोलन पेटवण्यासाठी जे काही करणे शक्य आहे, ते करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कालच्या आंदोलनात ५ आयपीएस अधिकारी आणि ५० पोलीस जखमी झाले आहेत. अनेकांची परिस्थिती गंभीर आहे. दिल्लीतील कित्येक दुकानांची तोडफोड करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या हायड्रोजन ट्रेनकडेही काही जणांनी मोर्चा वळवला होता. एकूणच आंदोलनात विद्यार्थी मूठभर होते, पण अराजकवाद्यांची संख्या जास्त होती. यूपीए (UPA) सरकारच्या काळात असे एकमेव आंदोलन झाले, जे २०१२ मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून देशात २०१५ मध्ये ‘अवॉर्ड वापसी’चा तमाशा झाला, २०१९ मध्ये शाहीन बाग, तर २०२१-२२ मध्ये शेतकरी आंदोलन झाले. शाहीन बाग आंदोलन हे सीएए (CAA) कायद्याच्या विरोधात झाले, तर शेतकरी आंदोलन हे तीन शेती कायद्यांच्या विरोधात झाले. पहिल्या टर्ममध्ये मोदी सरकारने हे सगळे पाहिले. आता तिसऱ्या टर्ममध्ये ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा प्रयोग सुरू आहे. या आंदोलनाला एफसीआरए (FCRA) कायद्याची पार्श्वभूमी आहे.



