पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आंदोलन केले होते. त्यावरून सोनम वांगचुक यांच्या पत्नींनी टीका केली आहे. या आंदोलनात राहुल गांधी आणि पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते ताब्यात घेण्यात आले होते.
वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधातील लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या गीतांजली आंग्मो यांनी म्हटले की, २१ जुलै रोजी काँग्रेसने केलेले आंदोलन “प्रामाणिक नव्हते”, आणि राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याऐवजी जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांसोबत सहभागी व्हायला हवे होते.
“वांगचुक यांच्या प्रतिमेचा राजकीय वापर केला जात आहे”
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत आंग्मो यांनी सूचित केले की, काही राजकीय नेते आता सोनम वांगचुक आणि त्यांच्या प्रतिमेचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत, मात्र जनता आता अशा गोष्टींना फसू शकत नाही. गेल्या आठवड्यात जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळावरून हटविण्यात आलेले सोनम वांगचुक सध्या रुग्णालयातूनच आपले उपोषण सुरू ठेवत असून, गुरुवारी त्यांच्या उपोषणाचा २६ वा दिवस होता.
त्या म्हणाल्या, “पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनात प्रामाणिकपणा नव्हता. आता जनता फसणार नाही. हा जागृत भारत आहे. जे प्रामाणिक नाहीत, त्यांना तरुण पिढी नाकारेल.”
राहुल गांधींसह काँग्रेसचे आंदोलन
दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी संसद मोर्चादरम्यान विद्यार्थी आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७, लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानाजवळ अभूतपूर्व धरणे आंदोलन केले होते. मंगळवारी आंदोलनादरम्यान नाट्यमय घडामोडी घडल्या. राहुल गांधी यांना पोलिसांनी उचलून आंदोलनस्थळावरून हटवले आणि ताब्यात घेतले. या गोंधळात त्यांच्या नाकातून रक्तस्रावही झाला.
“राजकीय नेत्यांनी कृतीतून दाखवावे”
पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत आंदोलन नेऊन काँग्रेसने प्रशासकीय अपयशाचा मुद्दा राजकीय जबाबदारीच्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न केला होता. आंग्मो यांच्या वक्तव्याचा रोख याच दिशेने असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या मते, हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय स्वतःहून उभे राहिलेले जनआंदोलन आहे.
हे ही वाचा:
अनाहतची विजयी मुसंडी; क्वार्टर फायनलमध्ये धडक
शुम्बा बाहेर, झिम्बाब्वेची ताकद कमी!
कंगाल पाकिस्तानची अमेरिकेकडे भीख!
आंदोलकांची दरोडेखोरी! पोलीसांचे ओळखपत्र अन् सोन्याची साखळी लांबवली
“हे आंदोलन पूर्णपणे अपक्ष आहे”
गीतांजली आंग्मो यांनी स्पष्ट केले की, कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने राजकीय पक्षांना स्पष्ट संदेश दिला आहे की, केवळ प्रतीकात्मक आंदोलन किंवा घोषणांनी आता चालणार नाही.
त्या म्हणाल्या, “या आंदोलनाने प्रत्येक राजकीय नेत्याला दाखवून दिले आहे की, त्यांनी बोलतात तसे प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवले पाहिजे. आता लोकांची दिशाभूल करणे किंवा बनावट प्रामाणिकपणा दाखवणे शक्य नाही.”
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शेव्हनिंग शिष्यवृत्तीधारक असलेल्या आंग्मो यांनी सांगितले की, हे आंदोलन कोणत्याही राजकीय गटाशी जोडलेले नाही. “आमच्यासाठी ना सत्ताधारी आहेत, ना विरोधक. आमच्यासाठी संसद ही सर्वोच्च संस्था आहे. संसदेने शिक्षणाला मूलभूत राष्ट्रीय प्रश्न म्हणून पाहावे, एवढीच आमची अपेक्षा आहे.”
तथापि, त्यांनी असेही स्पष्ट केले की, राजकीय हेतू न ठेवता आंदोलनात सहभागी होणाऱ्यांचे स्वागत आहे. “जो कोणी कोणताही राजकीय अजेंडा न घेता येईल, त्याचे आम्ही स्वागत करू. मात्र स्वतःचा अजेंडा घेऊन येणारे लोक आपोआप बाजूला पडतील, कारण हे आंदोलन प्रामाणिकपणा आणि शुद्ध हेतूंतून जन्माला आले आहे.”
सोनम वांगचुक यांच्या नव्या मागण्या
१८ जुलै रोजी जंतर-मंतरवरून हटविल्यानंतर गीतांजली आंग्मो सातत्याने वांगचुक यांच्या सोबत आहेत. सुरुवातीला त्यांना सरकारी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आंग्मो यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलविण्याची परवानगी दिली.
बुधवारी वांगचुक यांनी आपल्या उपोषणाची सांगता करण्यासाठी सरकारसमोर काही अटी मांडणारे पत्र प्रसिद्ध केले. त्यांनी सरकारकडून अशी हमी मागितली की, २० जुलैच्या विद्यार्थी मोर्चात सहभागी झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. मात्र, यापूर्वी सातत्याने मांडली जात असलेली केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या पत्रात नव्हती. त्यामुळे वांगचुक यांनी आपल्या भूमिकेत काहीशी मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा सुरू झाली. तथापि, वांगचुक यांनी सांगितले की, या आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णालयात भेट देणारे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी त्यांना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही विचार केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.







