‘नीट’ २०२६ पुनर्परीक्षेत देशात दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या पांशुल बन्सल याने प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी देशभर आंदोलन सुरू असताना आपण आंदोलनात सहभागी न होता घरी राहून अभ्यास करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
९९.९९९९ पर्सेंटाइल मिळवत देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या बन्सल याने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला परीक्षा रद्द झाल्यामुळे निराशा झालो होतो. मात्र, नंतर त्याने त्याकडे स्वतःची कामगिरी अधिक चांगली करण्याची संधी म्हणून पाहिले.
“मी विचार केला की आंदोलनात जाऊन काय होणार? त्याऐवजी मी घरी बसून अभ्यास करू शकतो, माझी कौशल्ये सुधारू शकतो आणि अधिक गुण मिळवू शकतो,” असे बन्सल याने एनडीटीव्हीचे पत्रकार शिव अरूर यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
त्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी देशभरात विद्यार्थी आंदोलन तीव्र झाले असून, हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. तसेच विरोधी पक्षांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा:
हेटमायर-रदरफोर्डची तुफानी फटकेबाजी
“आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं”
इटर्नलची तुफान झेप! नफ्यात २६८ टक्क्यांची उसळी
‘वाघनख’च्या चिन्हासह INS मालवण नौदलात दाखल!
पुनर्परीक्षेत ७१५ गुण
दिल्लीतील ग्रेटर कैलाश येथील के.आर. मंगळम वर्ल्ड स्कूलचा विद्यार्थी असलेल्या पांशुल बन्सलने पुनर्परीक्षेत ७१५ गुण मिळवले.
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची मूळ ‘नीट’ परीक्षा ३ मे रोजी झाली होती. मात्र, प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनंतर १२ मे रोजी ती रद्द करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.
त्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत २१ जून रोजी पुनर्परीक्षा घेण्यात आली आणि १६ जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात आला.
‘सुरुवातीला निराशा झालो, पण…
पहिली परीक्षा रद्द झाल्यानंतरची भावना सांगताना बन्सल म्हणाला, “सुरुवातीला मला खूप निराशा आणि दुःख वाटले. पण एक-दोन तासांनंतर मी सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला आणि यावेळी आणखी चांगली कामगिरी करण्याचा निर्धार केला.”
त्याने सांगितले की, मूळ परीक्षेत त्याला सुमारे ७०६ गुण मिळाले होते. पुनर्परीक्षेत त्याने त्यात सुधारणा करत ७१५ गुण मिळवले.
‘अभ्यासाचे वेळापत्रक बदलले नाही’
अतिरिक्त मिळालेल्या दीड महिन्याच्या कालावधीत काय बदल केले, असे विचारले असता बन्सल म्हणाले,
“मी माझ्या वेळापत्रकात कोणताही बदल केला नाही. मी पूर्वीप्रमाणेच अभ्यास सुरू ठेवला. फक्त या दीड महिन्यात माझ्याकडून जे काही सर्वोत्तम होऊ शकते ते करण्याचा प्रयत्न केला आणि बाकी सर्व देवावर सोडले.”
‘नकारात्मक विचार टाळले’
परीक्षा रद्द झाल्यानंतर सुरुवातीला आपण चांगली कामगिरी केली असून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा असल्याने प्रश्न पडला होता, असेही त्यांनी सांगितले.
“मी स्वतःला सांगितले की नकारात्मक विचार करून काही फायदा नाही. मला सर्व विसरून माझ्या मुख्य ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवे. जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल. परीक्षा संपल्यानंतर ताण आणि चिंता देखील संपेल,” असे ते म्हणाले.
आंदोलनावर भाष्य करण्यास नकार
देशातील विविध भागांत सुरू असलेल्या आंदोलनांबाबत मत विचारले असता पांशुल बन्सल यांनी कोणतीही भूमिका घेण्यास नकार दिला.







