दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधाचे पडसाद आता मुंबईत उमटले आहेत. दिल्लीतील आंदोलनाचे लोण थेट मुंबईपर्यंत पोहोचले असून, चेंबूर आणि दादर येथील शिवसेना भवन परिसरात विद्यार्थी आणि युवकांनी मोठे आंदोलन छेडले. या आंदोलनात ‘नीट’ पेपरफुटी आणि त्यांनतर दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात दिल्ली पोलीसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध हा नोंदवण्यात आला. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाकडे राज्यभराचे लक्ष वेधले गेले.
भर पावसातही शेकडो विद्यार्थी आणि तरुण आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. हातात फलक आणि बॅनर घेऊन त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “विद्यार्थ्यांवरील अत्याचार बंद करा”, , “लाठीचार्जचा निषेध असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. पावसाची पर्वा न करता विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले.
हे ही वाचा:
मैदानाबाहेर वॉर्नर क्लीन बोल्ड; मद्यधुंद वाहनचालविल्याची कबुली
हेटमायर-रदरफोर्डची तुफानी फटकेबाजी
“आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं”
शिवसेना खासदार विलिनीकरण प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
आंदोलनादरम्यान राज ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि भूमिका शांतपणे ऐकून घेत त्यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा व्यक्त केला. त्यानंतर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही आंदोलकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी म्हणजे दिल्लीतील लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीला घातक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. देशभरातील विद्यार्थ्यांनी अशा घटनांविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनामुळे दादरमधील शिवसेना भवन परिसरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि काही काळ संपूर्ण रस्ता जाम झाला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांकडून सातत्याने आवाहन करण्यात आले.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता देशातील इतर शहरांप्रमाणेच मुंबईतही उमटू लागल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणावर केंद्र सरकारची भूमिका काय असेल आणि पुढे आंदोलनाची व्याप्ती वाढणार का, याकडे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







