तेलंगणामधील उस्मानिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये निदर्शने करण्यास बंदी; भाजपाकडून टीका

भाजपा नेते रामचंद्र राव यांनी निर्णयाला म्हटले अघोषित आणीबाणी

तेलंगणामधील उस्मानिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये निदर्शने करण्यास बंदी; भाजपाकडून टीका

तेलंगणाच्या उस्मानिया विद्यापीठाने अनुकूल आणि शांततापूर्ण वातावरणात शिक्षण सुलभ करण्यासाठी कॅम्पसमध्ये धरणे, निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यास बंदी घातली आहे. यावर बीआरएस आणि भाजपाने निषेध केला आहे. अलिकडच्या काळात असे आढळून आले आहे की, विद्यार्थी/विद्यार्थी गट विभाग/महाविद्यालय केंद्रांच्या प्रशासकीय इमारतीत घुसून निदर्शने आणि धरणे देत आहेत, ज्यामुळे प्रशासकीय कामात व्यत्यय येत आहे आणि समाजाला विद्यापीठाबद्दल चुकीची धारणा निर्माण होत आहे, असे उस्मानिया विद्यापीठाने परिपत्रकात म्हटले आहे.

परिपत्रकात असेही म्हटले आहे की, उस्मानिया विद्यापीठाच्या आवारात अतिक्रमण करणे, धरणे आणि आंदोलने करणे, घोषणाबाजी करणे, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे अधिकृत कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, विद्यापीठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध असंसदीय आणि घाणेरडी भाषा वापरणे प्रतिबंधित आहे. तसेच या क्रियाकलापांमध्ये सहभाग आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाने दिला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयावर बीआरएस आणि भाजपाने टीकेची झोड उठवली आहे.

भाजपा नेते रामचंद्र राव यांनी याला अघोषित आणीबाणी म्हटले आहे. तसेच ते म्हणाले की, विद्यापीठ तेलंगणा सरकारच्या इशाऱ्यावर हे असे निर्णय घेत आहे. तेलंगणामध्ये सरकारने अघोषित आणीबाणी लागू केली आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कोणतेही धरणे किंवा मेळावा होणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश सरकारने उस्मानिया विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. विद्यापीठ कॅम्पस हा आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिला आहे आणि तेलंगणा राज्य निर्माण करण्यास विद्यार्थ्यांनीच मदत केली होती. विद्यापीठ हे सरकारच्या इशाऱ्यावर करत आहे. सरकार विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या रोजगार आणि इतर मागण्यांना दडपून टाकू इच्छित आहे. भाजप सरकारच्या अशा कृतीचा निषेध करते, अशी टीका भाजपा नेत्याने केली आहे.

हे ही वाचा..

तेज प्रताप यादव यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पोलिसाला पदावरून हटवले

उत्तर मॅसेडोनियामध्ये कॉन्सर्ट दरम्यान भीषण आग; ५१ जणांनी गमावले प्राण

पाक लष्कराच्या ताफ्यावर हल्ला; ९० सैनिक ठार झाल्याचा बलुच लिबरेशन आर्मीचा दावा

अफझलखान, औरंगजेबची कबर नष्ट केल्याशिवाय राहणार नाही

काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल करताना, बीआरएस नेते कृष्णांक यांनी पक्षाला असहिष्णु म्हटले आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकार जे लोकशाही सरकार असल्याचा दावा करते आणि त्यांचे नेते राहुल गांधी संपूर्ण भारतात लाल संविधान दाखवतात ,पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ऐतिहासिक उस्मानिया विद्यापीठ परिसर जो तेलंगणा आंदोलनासाठी निषेधाचे केंद्रबिंदू राहिला आहे, तिथे काँग्रेस सरकारने लोकशाही निषेधांवर बंदी घातली आहे. काँग्रेस सरकार इतके असहिष्णु आहे की त्यांना टीकाही सहन होत नाही, असे ते म्हणाले.

Exit mobile version