काल मुंबईतील शिवतिर्थ येथे झालेल्या संयुक्त सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. या सभेत दोघांनीही उद्योगपती गौतम अदानी यांचे नाव घेत, अदानी समूहाला सरकारकडून विशेष सवलती दिल्या जात असल्याचा आरोप केला.
मात्र या सभेनंतर काही वेळातच राज ठाकरे यांचे अदानींसोबतचे जुने फोटो सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दोन्ही ठाकरेंवर टीका करत आपल्या एक्स खात्यावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “बिच्चारे अदानी-अंबानी… कोणताही कामधंदा न करता देश-विदेशात मालमत्ता कशा उभारायच्या? अब्जाधीश कसं व्हायचं? याचा फॉर्म्युला विचारण्यासाठी अदानी-अंबानी वारंवार ठाकरे बंधूंना भेटत असतात. परंतु ठाकरे काय फॉर्म्युला द्यायला तयार नाहीत.” या पोस्टसोबत त्यांनी ठाकरे बंधूंचे अंबानी आणि अदानी यांच्यासोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
पहा ट्विट
बिच्चारे अदानी अंबानी…
कोणताही कामधंदा न करता देश विदेशात प्रॉपर्टी कशा बनवायच्या? अब्जाधीश कसं व्हायचं? याचा फॉर्म्युला विचारण्यासाठी अदानी अंबानी वारंवार ठाकरे बंधूंना भेटत असतात. परंतु ठाकरे काय फॉर्म्युला द्यायला तयार नाहीत. pic.twitter.com/1s08QMe23J— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 11, 2026
दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मोठ्या उद्योगसमूहांना झुकते माप दिले जात असून सामान्य जनता, स्थानिक छोटे उद्योग आणि मराठी माणूस बाजूला पडत आहे. सरकारच्या धोरणांमुळे काही निवडक उद्योगपतींचाच फायदा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनीही याच मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधत, “विकासाच्या नावाखाली काही मोजक्याच लोकांचे भले होत आहे, तर सामान्य माणसाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे,” अशी टीका केली.
हे ही वाचा:
“अमेरिकेसाठी भारतापेक्षा महत्त्वाचा कोणताही भागीदार नाही”
जिल्हा परिषद निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्यास मुदतवाढ; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
आदित्य आणि राज ठाकरे कोण आहेत? मी मुंबईत येणारच
राष्ट्रीय शेअर बाजारात २०२५मध्ये निफ्टी भक्कम, आयपीओ बाजारात महाराष्ट्र अव्वल
या सर्व घडामोडींमुळे ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर विरोधकांकडून दुटप्पीपणाचा आरोप केला जात असून, हा मुद्दा राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आला आहे.
