बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे थोरले पुत्र तेज प्रताप यादव यांनी त्यांचा अंगरक्षक म्हणून नियुक्त केलेल्या पोलिस कॉन्स्टेबलला नाचण्यास सांगितल्यानंतर त्याचा गणवेशात नाचण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर याची चर्चा सर्वत्र झाल्यानंतर पोलिसाला पदावरून काढून टाकण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी होळी उत्सवादरम्यान घडलेल्या या घटनेत कॉन्स्टेबल दीपक कुमार हा तेज प्रताप यादव यांच्या नाचण्याच्या सूचनांचे पालन करताना दिसत होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरातून यावर टीका झाली होती.
शुक्रवारी पक्षाच्या समर्थकांसोबत होळी साजरी करताना तेज प्रताप यादव यांनी कॉन्स्टेबलला गाण्यावर नाचण्याचा आदेश दिला आणि जर त्याने नकार दिला तर त्याला निलंबित केले जाईल असा इशारा दिला. “मी गाणे वाजवीन आणि तुम्हाला नाचावे लागेल,” असे तेज प्रताप म्हणाले होते. पोलिसाकडे बोट दाखवत म्हणाले की जर तो नाचला नाही तर त्याला निलंबित केले जाऊ शकते. यानंतर त्या पोलिसाने आज्ञा पाळली आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये थोडा वेळ नाचला. या घटनेचा एक व्हिडिओ, मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.
हे ही वाचा..
उत्तर मॅसेडोनियामध्ये कॉन्सर्ट दरम्यान भीषण आग; ५१ जणांनी गमावले प्राण
पाक लष्कराच्या ताफ्यावर हल्ला; ९० सैनिक ठार झाल्याचा बलुच लिबरेशन आर्मीचा दावा
अफझलखान, औरंगजेबची कबर नष्ट केल्याशिवाय राहणार नाही
छोट्या व्यापाऱ्यांना मिळणार समान संधी
या वादानंतर, पाटणा येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या एका प्रेस रिलीजमध्ये दीपक कुमार यांना तेज प्रताप यादव यांच्या अंगरक्षक पदावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली असून ‘इंडिया टुडे’ने याचे वृत्त दिले आहे. या पोलिसाला आता पुन्हा पोलिस लाईनमध्ये नियुक्त करण्यात आले आहे, तर त्यांच्या जागी वेगळ्या एका कॉन्स्टेबलची नियुक्ती करण्यात आली आहे.