जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्याकडून सुरू असलेले ‘ऑपरेशन शेरवाली’ आठव्या दिवशीही सुरू आहे. परिसरात दहशतवादी लपून बसल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर हे संयुक्त शोध अभियान सुरू करण्यात आले होते.
राजौरी जिल्ह्यातील मंजाकोट सेक्टरमधील गंभीर मुगलान आणि डोरीमल या घनदाट जंगल भागात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत या भागात अधूनमधून स्फोट आणि गोळीबाराच्या घटनाही घडल्या आहेत. दहशतवाद्यांविरोधातील या मोहिमेला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन शेरवाली’ असे नाव दिले आहे.
गेल्या आठवड्यात संशयास्पद हालचालींबाबत गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन संशयित व्यक्ती त्या भागात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण क्षेत्राची कसून तपासणी करण्यात आली. दहशतवाद्यांच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर सुरक्षा दलांनी गोळीबारही केला होता. पीर पंजाल पर्वतरांगेतील हे जंगल क्षेत्र उंच डोंगर, घनदाट वनराई आणि मर्यादित प्रवेशमार्ग यांमुळे दहशतवादविरोधी कारवायांसाठी अत्यंत आव्हानात्मक मानले जाते.
मोहीम सुरू असताना सुरक्षा दलांनी आसपासच्या भागांतील निगराणी आणखी वाढवली आहे. विविध ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले असून वाहनांची तसेच पादचाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. दिवसभर सुरक्षा दलांनी जंगलातील विविध भागांत नियोजनबद्ध आणि सखोल शोधमोहीम राबवली. या कारवाईदरम्यान आतापर्यंत कोणत्याही बाजूने जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
हे ही वाचा:
मुंबईत पुन्हा CNG महागला; किलोमागे ८६ रुपये
खरेदीची संधी? आठवड्यात सोनं हजाराहून, चांदी दोन हजाराहून अधिक रुपयांनी स्वस्त
पाकने ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळला? पॅलेस्टाईन, गाझा बाबतीतील भूमिकेवर ठाम!
लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यात ११ जण ठार
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी सुरक्षा दलांनी अलीकडच्या काळात आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी नियंत्रण रेषेजवळ (LoC) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. त्याआधी दहशतवाद्यांना मदत करणारे आणि इतर संशयितांच्या ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आली होती.







