महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. मतदानाच्या आधी PADU (प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) हे नवे मशीन वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याचा आरोप त्यांनी केला. या निर्णयाबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण आल्यास बॅकअप म्हणून हे मशीन वापरण्याचा दावा केला जात असला, तरी “ही कुठली बेबंदशाही सुरू आहे?, ही कसली लोकशाही?” असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोग सरकारला हवे तेच करत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे कोणत्याही प्रश्नावर उत्तर द्यायला तयार नाहीत. सरकारला ज्या सुविधा हव्या आहेत, त्यासाठीच निवडणूक आयोग काम करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
हे ही वाचा :
पालक पनीर वरुन वाद, अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांनी जिंकला लढा
सोन्या-चांदीने गाठले आकाश, नवे उच्चांक प्रस्थापित
१५ उपग्रह हरवले पण ‘KID’ बचावला; तीन मिनिटे अवकाशातून पाठवली माहिती
इस्रायलचा संयुक्त राष्ट्रांच्या सात एजन्सींमधून बाहेर पडण्याचा निर्णय
राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपापल्या विभागात सतर्क राहण्याचे आवाहन केले. काही ठिकाणी पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत, आनंदाची बाब म्हणजे काही नागरिक त्याला विरोध करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच प्रचाराची अधिकृत कालमर्यादा संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी प्रचार करण्याची मुभा दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही पद्धत पूर्वी कधीच नव्हती, असे सांगत त्यांनी यामुळे मतदार आणि राजकीय पक्षांमध्ये गोंधळ व भ्रम निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की पाडू मशीन सर्वत्र वापरले जाणार नाही. ईव्हीएम अचानक बंद पडल्यासच ते बॅकअप म्हणून वापरले जाईल. त्यामुळे ही मशीन केवळ आपत्कालीन तांत्रिक मदतीपुरती मर्यादित राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
