पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार पडल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्ते, नेते यांची भीषण अवस्था झालेली आहे. एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये दादागिरी करणारे अनेक नेते, कार्यकर्ते हे आता याचकाच्या भूमिकेत दिसू लागले आहेत. पोलिस जर सिंघम असतील तर मी पुष्पा आहे, असे म्हणणारा तृणमूलचा फाल्टा मतदारसंघातला नेता जहांगीर खान याची अवस्था अशीच बिकट झालेली पाहायला मिळाली.
फाल्टाचा माजी आमदार जहांगीर खान याला बंगाल एसटीएफने ८ जून रोजी अटक केली होती. नेपाळमार्गे परदेशात पळून जाण्याचा जहांगीर खानचा प्रयत्न होता. पण त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. अटकेनंतर तीन दिवसांनी म्हणजे ११ जून रोजी पोलिस त्याला फाल्टा येथे घेऊन आले. मात्र, त्याला चक्क हाफ पॅन्टमध्ये पोलिसांनी त्या परिसरात फिरवले. त्याची ती धिंड बघायला लोक जमले होते.
फाल्टा येथील निवडणुकीत जहांगीर खान उभा राहिला नाही. अचानक त्याने या निवडणुकीतून माघार घेतली. शेवटी तिथे भाजपाचा उमेदवार जिंकला. मात्र त्यानंतर जहांगीर खान फरार होता. नंतर त्याला बंगाल स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) नेपाळ सीमेजवळ अटक केली होती.
जहांगीर खान यांच्याविरोधात फाल्टा पोलीस ठाण्यात खंडणी वसुली, धमकी देणे, राजकीय हिंसा आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याशी संबंधित सातपेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तो फरार होता. पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकत होते.
एसटीएफला माहिती मिळाली होती की, अटकेपासून बचाव करण्यासाठी जहांगीर नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. या माहितीच्या आधारे कारवाई करून त्यांना नेपाळ सीमेच्या जवळून अटक करण्यात आली. आता तपास यंत्रणा हे शोधत आहेत की जहांगीर खानला त्या काळात कोणी आश्रय दिला आणि कोणकोणत्या ठिकाणी तो लपून बसला होता.
हे ही वाचा:
कच्च्या तेलाच्या दरघसरणीनंतर सोने-चांदीची झेप
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर मोठा दिलासा; तेलाच्या किमती ९० डॉलरखाली
पहिले ट्रिलियनपती एलॉन मस्क! संपत्ती आता तैवानच्या जीडीपीपेक्षाही जास्त
मोदी सरकारच्या १२ वर्षांत महिला सक्षमीकरणाला नवी दिशा
‘पुष्पा’ विधानामुळे चर्चेत
फाल्टा विधानसभा मतदारसंघ बंगाल निवडणुकांदरम्यानही चर्चेत होता. निवडणूक आयोगाने अजय पाल शर्मा यांना निरीक्षक म्हणून तेथे पाठवले होते. उत्तर प्रदेशमध्ये त्यांना ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाते. मतदानापूर्वी अजय पाल शर्मा यांनी जहांगीर खान यांच्या घरी जाऊन त्यांच्या सहकाऱ्यांना इशारा दिला की, त्यांनी मतदारांना धमकावू नये.
यावर एका निवडणूक सभेत प्रतिक्रिया देताना जहांगीर खान म्हणाला होता की, जर तुम्ही (अजय पाल शर्मा) सिंघम असाल, तर मी पुष्पा आहे. पुष्पा कधीही झुकत नाही.
जहांगीर खान याला टीएमसीच्या तिकिटावर २०२६ ची विधानसभा निवडणूक फाल्टा मतदारसंघातून लढवायची होती. पण तिथे निवडणुकीतील कथित गोंधळामुळे २१ मे रोजी येथे पुनर्मतदान झाले. पुनर्मतदानाच्या ४८ तास आधी जहांगीर खानने निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपली होती. त्यामुळे ईव्हीएमवर टीएमसी उमेदवार म्हणून त्यांचे नाव कायम राहिले.
२४ मे रोजी निकाल जाहीर झाल्यावर जहांगीर खानचा पराभव झाला. भाजप उमेदवाराने १ लाख ९ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला.
