आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांत पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन काम करणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आमच्या दोन पक्षांची एकत्र येण्यासंदर्भातली अशी कोणतीच चर्चा झाली नाही. आम्ही सांगितले की, आम्ही आमच्या चिन्हावर लढू, तुम्ही तुमच्या चिन्हावर लढा. काकडे पुढे म्हणाले की, सुप्रिया सुळे म्हणाल्या की आपण मविआसोबत साडेतीन वर्षे काम केले आहे. तेव्हा शिवसेना उबाठा, काँग्रेससोबतच आपण युती करूया. त्यामुळे अजित पवारांसोबत युती करण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे आम्ही तसेच अजित पवारांना सांगितले की, तुमचे आमचे काही जमणार नाही. त्यानुसार आम्ही तिथून परत आलो. यापेक्षा अधिक तिथे कोणतीही चर्चा झाली नाही.
हे ही वाचा:
राजधानीत पोलिसांचे ‘ऑपरेशन आघात ३.०; २८५ आरोपींना अटक
पाकिस्तानात नाही राहायचे, गेल्या वर्षी ७ लाख लोकांनी सोडला देश
धुरंधरला प्रचारकी चित्रपट म्हणणाऱ्यांना अनुपम खेर यांची चपराक
बॉक्स ऑफिसवर स्टार्सचा ‘महामुकाबला’
यासंदर्भात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले की, ते अजित पवारांकडे गेलेच कसे, हेच कळत नाही. त्या विषयावर मला अधिक काही बोलायचे नाही. पण खरं तर समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे. अजित पवारांनी भाजपासोबतचे संबंध तोडले पाहिजेत.
हे दोन पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांनंतर राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे पुण्यातील नेते प्रशांत जगताप यांनी नाराजी प्रकट केली होती. त्यातूनच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यावरूनही चर्चा रंगल्या. मात्र सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी असा राजीनामा दिला असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. मात्र अखेर जगताप यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. मात्र आता हे दोन्ही पक्ष एकत्रच येत नसल्यामुळे नव्याने चर्चा रंगली आहे की, मग प्रशांत जगताप यांनी नेमका पक्ष सोडला कशासाठी? काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी आपण काँग्रेसच्या विचारधारेवरच काम करणार असल्याचे म्हटले होते. मात्र राष्ट्रवादीचे दोन पक्ष एकत्रच न आल्यामुळे प्रशांत जगताप यांच्या त्या पक्षप्रवेशाला काय अर्थ आहे, असा सवालही विचारला जात आहे.
