केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या काही सदस्यांनी केलेल्या जल्लोषाच्या व्हिडिओंवरून सुरू झालेल्या वादात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय साजरा करताना “सन्मान, संयम आणि जबाबदारी” पाळण्याचे आवाहन त्यांनी समर्थकांना केले.
“विजयासोबत नम्रताही असली पाहिजे. सन्मान, संयम आणि जबाबदारीने विजय साजरा करा,” असे वांगचुक यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले. यश मिळवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते कशा पद्धतीने साजरे केले जाते हेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि सीजेपीने दिल्लीतील जंतर-मंतरवरील ३७ दिवसांचे आंदोलन मागे घेतल्यानंतर पक्षाच्या काही प्रमुख सदस्यांचे नाचत-गात जल्लोष करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर या व्हिडिओंवरून तीव्र चर्चा सुरू झाली.
सोनम वांगचुक नाराज?
जल्लोषाचा थेट उल्लेख टाळत वांगचुक यांनी आंदोलनाच्या यशानंतर संयम राखण्याचे आवाहन केले. “विजयात नम्रता असलीच पाहिजे. सन्मानाने, संयमाने आणि जबाबदारीने आनंद साजरा करा,” असे त्यांनी म्हटले.
नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सोनम वांगचुक हे प्रमुख चेहरा बनले होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सरकारी रुग्णालयात हलवले होते. केंद्र सरकारने आंदोलकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही तसेच कथित पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या नीट विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी २६ दिवसांचे उपोषण सोडले.
सीजेपीवर टीका का?
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि आंदोलन मागे घेतल्यानंतर सीजेपीच्या नेत्यांचे जल्लोषाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली. काही समर्थकांनी या आंदोलनामागे कथित पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा मुद्दा असल्याने अशा प्रकारचा उत्सव असंवेदनशील असल्याचे म्हटले. तर काहींनी अनेक राज्यांमध्ये आंदोलकांवर अद्यापही पोलीस कारवाई आणि गुन्हे दाखल असताना अशा जल्लोषाच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केले.
हे ही वाचा:
अल्पवयीन विद्यार्थी आंदोलनकर्त्यांची तात्काळ सुटका करा
संपत्ती वाढली, पण सल्लागार कमी! भारतासमोर नवे आर्थिक आव्हान
भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग ठप्प; शेकडो भाविक अडकले
जंतर मंतर आंदोलनात २८७३ गुन्हेगार
सीजेपीची भूमिका
टीकेला उत्तर देताना सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी हा जल्लोष नव्या पिढीच्या विचारसरणीचे प्रतीक असल्याचे सांगितले.
“आम्ही रस्त्यावर बसून आंदोलन करू शकतो. नाचत आंदोलन करू शकतो. कोल्ड कॉफी पितानाही संघटन उभारू शकतो. हीच आमच्या पिढीची शैली आहे. आम्ही आत्मविश्वासू, सर्जनशील, जिद्दी आहोत आणि कोणत्याही चौकटीत बसणारे नाही,” असे त्यांनी एक्सवर लिहिले.
ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी आंदोलनासाठी निधी कोणी दिला आणि सीजेपी नेत्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘विजय पार्टी’ केली, असा आरोप केल्यानंतर दास यांनी तो फेटाळून लावला.
“ते पंचतारांकित हॉटेल नव्हते. जास्तीत जास्त दोन किंवा तीन स्टार दर्जाचे ठिकाण होते,” असे ते म्हणाले. देशभरातून आलेल्या सुमारे १५० ते २०० स्वयंसेवकांचा ३७ दिवसांच्या आंदोलनातील योगदानाबद्दल सन्मान करण्यासाठी तळमजल्यावरील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीजेपीच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचा शेवट केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांच्या अनेक प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर झाला. त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, कथित पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई आणि आंदोलकांवरील कायदेशीर कारवाई मागे घेण्याचे आश्वासन यांचा समावेश होता.
