इंग्लंडविरुद्ध दमदार विजय मिळवत भारताने अंडर-१९ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक यशानंतर बीसीसीआयने श्वविजेत्या संघासाठी मोठी घोषणा केली आहे. खेळाडू, तांत्रिक स्टाफ आणि निवड समितीसाठी एकूण ७.५ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी ‘आयएएनएस’शी बोलताना सांगितले, “झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे पार पडलेल्या अंडर-१९ पुरुष क्रिकेट विश्वचषकात विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाला ७.५ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. खेळाडू, तांत्रिक स्टाफ आणि निवड समिती यांच्यात रकमेचे वाटप कसे करायचे, यावर काम सुरू आहे; मात्र एकूण ७.५ कोटींचे पारितोषिक दिले जाणार आहे.”
हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने वैभव सूर्यवंशीच्या तुफानी खेळीच्या जोरावर ९ बाद ४११ धावांचा डोंगर उभारला. सूर्यवंशीने केवळ ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकारांसह १७५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. कर्णधार आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ५३ धावांचे योगदान दिले.
४१२ धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवर आटोपला. कॅलेब फाल्कनरने ६७ चेंडूत ७ षटकार आणि ९ चौकारांसह ११५ धावा केल्या, तर बेन डॉकिन्सने ६६ धावांची खेळी केली; मात्र इंग्लंडला पराभव टाळता आला नाही.
भारताने सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकत आपली क्रिकेटमधील मजबूत पायाभरणी पुन्हा अधोरेखित केली आहे. सैकिया यांनी सोशल मीडियावर लिहिले, “ही शानदार कामगिरी दीर्घकालीन खेळाडू विकास, स्पर्धात्मक देशांतर्गत रचना, समर्पित तांत्रिक स्टाफ, दर्जेदार प्रशिक्षक कार्यक्रम आणि सक्षम टॅलेंट ओळख प्रक्रियेचे फळ आहे. वयोगट क्रिकेट ही आमची प्रमुख प्राथमिकता आहे. बीसीसीआय भविष्यासाठी या पायाभूत रचनेत गुंतवणूक करत राहील. शाब्बास मुलांनो! देशाला तुमचा अभिमान आहे.”
भारतीय तरुण संघाच्या या यशामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण असून भविष्यातील स्टार खेळाडूंची नवी पिढी तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत.







