क्रिकेटच्या मैदानावर शांतपणे डाव सावरणारा, संकटात संघाला तारून नेणारा आणि परदेशात भारताला संस्मरणीय विजय मिळवून देणारा अजिंक्य रहाणे आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. फरक एवढाच—यावेळी हातात बॅट नसेल, तर माईक असेल!
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटला नुकताच निरोप देणारा रहाणे आता कमेंट्री बॉक्समध्ये दिसणार आहे. येत्या १५ ऑगस्टपासून गॉलमध्ये सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका कसोटी मालिकेत तो कमेंट्रीच्या दुनियेत पदार्पण करणार आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना अनेक संस्मरणीय डाव खेळलेल्या रहाणेला आता त्याच कसोटी क्रिकेटकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची संधी मिळणार आहे. मैदानावर फलंदाज म्हणून परिस्थितीचा अंदाज घेणारा रहाणे आता प्रेक्षकांना डावपेच, निर्णय आणि सामन्याची दिशा बदलणाऱ्या क्षणांचे विश्लेषण करून सांगणार आहे.
“टेस्ट क्रिकेट हे आपल्या खेळाचे सर्वोच्च शिखर आहे. इतकी वर्षे या फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता त्याच खेळाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अनुभव शेअर करण्यासाठी आणि खेळातील बारकावे चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी उत्सुक आहे,” असे रहाणेने म्हटले आहे.
३० जुलै २०२६ रोजी रहाणेने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मुंबईच्या या शैलीदार फलंदाजाने २०११ मध्ये वनडे आणि टी-२०, तर २०१३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने भारतासाठी शेवटची कसोटी जुलै २०२३ मध्ये खेळली.
रहाणेच्या कारकिर्दीची आकडेवारीही त्याच्या सातत्याची साक्ष देते. त्याने भारतासाठी ८५ कसोटी, ९० वनडे आणि २० टी-२० सामने खेळले. कसोटीच्या १४४ डावांत १२ शतके आणि २६ अर्धशतकांसह ५,०७७ धावा, वनडेत ३ शतके आणि २४ अर्धशतकांसह २,९६२ धावा, तर टी-२०मध्ये १ अर्धशतकासह ३७५ धावा त्याच्या नावावर आहेत.
मैदानावरची रहाणेची इनिंग संपली असली, तरी क्रिकेटशी त्याचे नाते तुटलेले नाही. आता ‘अजिंक्य’ फलंदाजाची दुसरी इनिंग ‘अजिंक्य’ विश्लेषक म्हणून किती रंगते, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना नक्कीच असेल.
