Nitish Reddy : भारतीय क्रिकेटर नितीश कुमार रेड्डीवर गुन्हा दाखल

Nitish Reddy : भारतीय क्रिकेटर नितीश कुमार रेड्डीवर गुन्हा दाखल

टीम इंडियाचा खेळाडू नितीश कुमार रेड्डी सध्या अडचणीत सापडला आहे. आधी तो दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला होता. त्यानंतर आता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बंगळुरूस्थित टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी स्क्वेअर द वनने रेड्डीवर 5 कोटींपेक्षा जास्त थकबाकी न भरल्याचा आरोप केला आहे.

माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी वेळी नितीश रेड्डी आणि स्क्वेअर द वन एजन्सी यांच्यात वाद झाला होता. या दोघांमध्ये 3 वर्षांचा करार होता. मात्र वादानंतर रेड्डीने करार तोडत नवीन कंपनीसोबत करार केला. त्यामुळे आता या रेड्डी आणि एजन्सीमध्ये मोठा वाद झाला असून हे प्रकरण आता कोर्टात गेले आहे. स्क्वेअर द वन प्रायव्हेट लिमिटेड एजन्सीचे संचालक शिव धवन यांनी नितीश रेड्डीवर करार तोडल्याचा आणि थकबाकी न भरल्याचा आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी आता सोमवारी (28 जुलै) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. स्क्वेअर द वन सोबत करार असताना नितीश रेड्डीने एजन्सीचे मीडिया प्रमोशनही केले होते, मात्र आता तो प्रमोशन करताना दिसत नाही.

क्रिकेटर नितीश कुमार रेड्डीने यावर प्रतिक्रिया देताना आपण न्यायालयात जाण्यास तयार असल्याचे म्हटलं आहे. रेड्डीने म्हटले की, मी स्वतःच एंडोर्समेंट डील मिळवली होती. यात स्क्वेअर द वन एजन्सीचा सहभाग नव्हता, त्यामुळे मी एजन्सीला कोणतेही पैसे देणार नाही अशी भूमिका रेड्डीने घेतली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात रेड्डीला संधी मिळाली होती. यात त्याने 45 धावा केल्या आणि तीन विकेट घेतल्या होत्या. मात्र त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तो संघातून बाहेर पडला आहे. तो आता भारतात परतला आहे. आता दुखापतीतून सावरत लवकरात लवकर संघात परतणे हे रेड्डीचे टार्गेट असणार आहे.

Exit mobile version