अवघ्या १४ वर्षे २९४ दिवसांचा वैभव सूर्यवंशी याने अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करत थेट इतिहास घडवला आहे. अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये खेळणारा तो जगातील सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. याआधी हा विक्रम भारतीय वंशाच्या नितीश कुमारकडे होता. त्यांनी १५ वर्षे २४५ दिवसांच्या वयात कॅनडाकडून डेब्यू केला होता. तो १८ वर्षांपूर्वीचा विक्रम आता वैभवने मोडीत काढला आहे.
गुरुवारी क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६च्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला फक्त ४ चेंडू खेळता आले. त्याने २ धावा केल्या. मोठी खेळी झाली नाही, पण त्याच्या नावावर गेलेला हा विक्रम भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण ठरला.
पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस नियम लागू झाल्यानंतर ६ विकेट्सने विजय मिळवला.
नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला उतरलेली अमेरिका संघ ३५.२ षटकांत केवळ १०७ धावांवर गारद झाली. अमेरिकेकडून नितीश सुदिनीने ५२ चेंडूत ३६ धावा केल्या, तर अदनित झांबने १८ धावा जोडल्या. भारताकडून हेनिल पटेलने भन्नाट गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा :
पुणे–पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पवारांना धक्का
वेन्यू बदलाच्या वादात आयसीसी थेट बांगलादेशात येणार
टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला दिलासा, शाहीन आफ्रिदी नेट्समध्ये परतला
भारतीय सशत्र दल: अदम्य धैर्य, शौर्य आणि अढळ दृढनिश्चय…
भारताला पावसामुळे सुधारित लक्ष्य म्हणून ३७ षटकांत ९६ धावा मिळाल्या होत्या. भारतीय संघाने हे लक्ष्य अवघ्या १७.२ षटकांत सहज गाठले. भारताकडून अभिज्ञान कुंडूने ४१ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. कर्णधार आयुष म्हात्रेने १९, विहान मल्होत्राने १८ धावा केल्या, तर कनिष्क चौहान १० धावांवर नाबाद राहिला. अमेरिकेकडून ऋत्विक अप्पिडीने २ विकेट्स घेतल्या.
भारतीय अंडर-१९ संघाचा पुढील सामना १७ जानेवारीला बांग्लादेशविरुद्ध याच मैदानावर होणार आहे. त्यानंतर २४ जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळवला जाणार आहे.
