इजिप्तमधील काहिरा येथे पार पडलेल्या आईएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप (रायफल, पिस्तूल आणि शॉटगन) स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी करत एकूण १६ पदके (५ सुवर्ण, ६ रौप्य, ५ कांस्य) जिंकत पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोजिशन्स स्पर्धेत हेमंत बर्मन याने ३५१.७ गुणांसह रौप्यपदक जिंकले. पात्रता फेरीत त्याने ५७८-२४x गुणांसह सातवे स्थान मिळवले होते. अंतिम फेरीत भारताचे वेदांत नितीन वाघमारे आणि रोहित कन्यानही होते. मात्र, रोहित ३११.९ गुणांसह सहाव्या, तर वेदांत ३००.५ गुणांसह सातव्या स्थानावर राहिले.
या स्पर्धेत कझाकस्तानच्या ओलेग नोस्कोवने ३५५.६ गुणांसह ज्युनियर वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करत सुवर्णपदक जिंकले, तर उझबेकिस्तानच्या निकिता सोलोकोवने कांस्यपदक मिळवले. भारताचे मानवेंद्र सिंह शेखावत (५७८-२३x), कुशाग्र सिंह राजावत (५७६-२४x) आणि हितेश श्रीनिवासन (५७४-२६x) यांना अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात जुहैर खान आणि आद्या कात्याल या जोडीने १९ गुणांसह कांस्यपदक जिंकले. पात्रता फेरीत त्यांनी १३७ गुण मिळवत पदक फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत सुरुवातीला ही जोडी रौप्यपदकाच्या शर्यतीत होती, मात्र शेवटच्या सिरीजमध्ये कामगिरी खालावल्याने त्यांना कांस्यावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात तेजल नाथावत, युगेश्वरी बैस, अनुष्का ठाकूर आणि ख्वाहिश शर्मा या भारतीय नेमबाजांना पदक मिळवता आले नाही.
दरम्यान, भारतीय ज्युनियर नेमबाजांचे आता लक्ष जून महिन्यात जर्मनीतील सुहल येथे होणाऱ्या आईएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपकडे लागले आहे.
