एशियन बीच गेम्स : महिला कबड्डी संघाचा सुवर्ण विजय, पुरुष संघ अंतिम फेरीत

एशियन बीच गेम्स : महिला कबड्डी संघाचा सुवर्ण विजय, पुरुष संघ अंतिम फेरीत

भारतीय महिला बीच कबड्डी संघाने एशियन बीच गेम्समध्ये श्रीलंकेवर ४७-३१ असा विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे.

महिला संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा ५०-३१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यातही त्यांनी एकतर्फी वर्चस्व राखत श्रीलंकेला पराभूत केले.

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, गांधीनगर यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, सान्या येथे भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले असून, प्रशिक्षण शिबिरातील मेहनतीचे फळ मिळाले आहे.

दरम्यान, भारतीय पुरुष कबड्डी संघाने पाकिस्तानवर ५०-२७ अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे.

ओलंपिक काउंसिल ऑफ एशिया आयोजित एशियन बीच गेम्स ही किनारी आणि बीच क्रीडांवर आधारित स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात २००८ मध्ये बाली (इंडोनेशिया) येथे झाली होती. २०१६ नंतर कोविड-१९ मुळे स्पर्धा लांबली होती आणि यंदा सान्या येथे पुन्हा आयोजन करण्यात आले आहे.

२०१६ च्या स्पर्धेत भारताने २४ पदके जिंकली होती, ज्यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि १८ कांस्य पदकांचा समावेश होता. महिला कबड्डी संघाने त्या वेळीही सुवर्णपदक जिंकले होते, तर पुरुष संघाला रौप्य पदक मिळाले होते.

Exit mobile version