भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी बेलफास्ट येथे रंगणार असून, या मालिकेबाबत आयर्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज बेन कॅलिट्झ प्रचंड उत्सुक आहे. विश्वविजेत्या भारतीय संघाविरुद्ध खेळण्याची संधी नेहमी मिळत नसल्याचे सांगताना त्याने ही मालिका अत्यंत रोमांचक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी संवाद साधताना कॅलिट्झ म्हणाला, “वैभव सूर्यवंशीसाठी आम्ही कोणतीही वेगळी रणनीती आखलेली नाही. विराट कोहली असो, श्रेयस अय्यर असो किंवा वैभव सूर्यवंशी… आम्ही प्रत्येक फलंदाजाकडे समान नजरेने पाहतो. ते सर्व जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांना बाद करण्यासाठी आम्ही नेहमीप्रमाणेच नियोजन केले आहे.”
वैभव सूर्यवंशीबद्दल बोलताना तो म्हणाला, “आयपीएलमधील त्याची कामगिरी विलक्षण होती. इतक्या कमी वयात त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण क्रिकेटप्रेमींसाठी विशेष ठरेल. मात्र आमचे लक्ष आमच्या खेळावरच आहे.”
भारताच्या दौऱ्याबद्दल तो म्हणाला, “विश्वविजेत्या संघाविरुद्ध खेळण्याची संधी रोज मिळत नाही. खेळाडू म्हणून अशा सामन्यांची उत्सुकता वेगळीच असते. भारत अत्यंत कौशल्यवान आणि संतुलित संघ आहे. आम्ही आमच्या ताकदीवर भर देत सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू.”
घरच्या मैदानाचा फायदा मिळणार असल्याचेही कॅलिट्झने स्पष्ट केले. “येथील खेळपट्टी, मैदानाचा आकार आणि हवामानाची आम्हाला चांगली माहिती आहे. त्या परिस्थितीचा फायदा घेत भारताच्या बलस्थानांना प्रत्युत्तर देण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असे तो म्हणाला.
आयरलंडकडून पदार्पणाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतीय वंशाच्या जय मूंदडाबद्दलही कॅलिट्झने कौतुक व्यक्त केले. “जयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो संघासाठी वेगळा पर्याय ठरू शकतो. त्याला आयर्लंडच्या जर्सीत खेळताना पाहण्याची मला उत्सुकता आहे,” असे तो म्हणाला.
कॅनडामध्ये जन्मलेल्या आणि दक्षिण आफ्रिकेत वाढलेल्या कॅलिट्झने चार वर्षांपूर्वी आयर्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. “येथील संस्कृती, क्रिकेट आणि मिळालेल्या संधींमुळे आयर्लंड माझे दुसरे घर बनले आहे. आता या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्याने सांगितले.
कर्णधार लोर्कन टकर यांच्या नेतृत्वाचेही त्याने कौतुक केले. “तो नैसर्गिक नेता आहे. कठीण परिस्थितीत संघाला प्रेरणा देण्याची त्याची क्षमता मोठी आहे. भारताविरुद्धची ही मालिका आमच्यासाठी मोठी परीक्षा असेल, पण विजयासाठी आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरू,” असा निर्धार कॅलिट्झने व्यक्त केला.
