क्रिकेटर शिखर धवनचा साखरपुडा संपन्न

प्रेयसी सोफी शाइनसोबत लवकरच अडकणार विवाहबंधनात

क्रिकेटर शिखर धवनचा साखरपुडा संपन्न

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवन याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शिखर धवन याने त्याची प्रेयसी सोफी शाइन हिच्याशी साखरपुडा केला असून, या गोड क्षणांचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. धवनच्या या आनंदाच्या बातमीवर चाहत्यांसह क्रीडाप्रेमी आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

१२ जानेवारी २०२६ रोजी शिखर धवनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास फोटो शेअर करत साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली. या फोटोमध्ये शिखर धवन आणि सोफी शाइन एकमेकांच्या हातात हात घालून आनंदी आणि समाधानी दिसत आहेत. दोघांच्या बोटातील साखरपुड्याच्या अंगठ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोसोबत धवनने भावनिक शब्दांत कॅप्शन लिहिले असून, प्रेम, आशीर्वाद आणि आयुष्यभर एकत्र राहण्याच्या निर्णयाबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
हे ही वाचा :
“फक्त फोटो दाखवून विकास होत नाही…”

‘संक्रमण काळात’ मोदी जाणार नव्या कार्यालयात

ब्रिटिश विद्यापीठांतील कट्टर मुस्लिम ब्रदरहूडमुळे अरब अमिरातीने शिष्यवृत्त्या रोखल्या

परंतु ठाकरे काय अंबानी-अदानीला फॉर्म्युला द्यायला तयार नाहीत…

या पोस्टवर चाहत्यांसह अनेक माजी व विद्यमान क्रिकेटपटू, तसेच बॉलिवूड आणि क्रीडाजगतातील प्रसिद्ध व्यक्तींनी धवन आणि सोफीला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आनंद, यश आणि सुखी संसाराच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
पाहा पोस्ट – 


शिखर धवन आणि सोफी शाइन यांनी मे २०२५ मध्ये आपले नाते सार्वजनिक केले होते. त्यानंतर दोघेही विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तसेच खासगी क्षणांमध्ये एकत्र दिसले आहेत. सोफी शाइन ही मूळची आयर्लंडची रहिवासी असून ती एका आंतरराष्ट्रीय कंपनीत प्रॉडक्ट कन्सल्टंट म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.

शिखर धवनच्या वैयक्तिक आयुष्यात यापूर्वी काही अडचणी आणि चढ-उतार आले असले, तरी आता तो नव्या आणि आनंदी आयुष्याच्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सध्या शिखर धवन अधिक आनंदी आणि सकारात्मक दिसत असून, चाहत्यांकडून त्याला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Exit mobile version