टी20 वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होत असून, त्याआधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गुरुवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. आगामी स्पर्धेत भारत यशस्वी ठरावा यासाठी त्यांनी विशेष प्रार्थना केली.
याआधीही गौतम गंभीर महत्त्वाच्या मालिकांपूर्वी देवदर्शनासाठी गेले आहेत. जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी त्यांनी मध्य प्रदेशातील माँ बगलामुखी मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आणि टी20 मालिकेदरम्यान कामाख्या मंदिरातही त्यांनी पूजा-अर्चना केली होती.
सध्या टीम इंडिया शानदार फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच भारताने न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली. बुधवारी झालेल्या सराव सामन्यातही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाने दमदार कामगिरी केली.
गौतम गंभीर यांची २०२४ मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने गेल्या वर्षी आशिया कप जिंकला. तसेच टी20 स्वरूपातील संघाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे.
टी20 वर्ल्ड कप २०२६ भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाणार आहे. भारत ७ फेब्रुवारीला यूएसएविरुद्ध पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्यानंतर १२ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध सामना होईल.
१५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना नियोजित असला तरी त्यावर सध्या सस्पेन्स आहे. पाकिस्तानी सरकारने त्यांच्या संघाला भारताविरुद्ध खेळण्यास परवानगी दिलेली नाही. भारत १८ फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध आपला शेवटचा साखळी सामना खेळणार आहे.
टी20 वर्ल्ड कप २०२६साठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, ईशान किशन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह.
