भारतीय ज्युनियर महिला संघाला शूटआउटमध्ये चिलीकडून पराभव

भारतीय ज्युनियर महिला संघाला शूटआउटमध्ये चिलीकडून पराभव

भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाला फोर नेशन्स मैत्रीपूर्ण स्पर्धेतील चौथ्या सामन्यात चिलीविरुद्ध २-२ अशी बरोबरी झाल्यानंतर शूटआउटमध्ये १-३ ने पराभव पत्करावा लागला.

भारतासाठी सुखवीर कौर (३५’) आणि कनिका सिवाच (४७’) यांनी गोल केले, तर चिलीकडून जैसिंटा सोलारी (२७’) आणि कर्णधार लॉरा मुलर (४२’) यांनी गोल नोंदवले.

पहिल्या दोन क्वार्टरमध्ये चिलीने आक्रमक खेळ दाखवत २७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये ३५व्या मिनिटाला सुखवीरच्या पेनल्टी कॉर्नर गोलमुळे बरोबरी साधली.

पुढे, ४२व्या मिनिटाला लॉरा मुलरने मैदानी गोल करत चिलीला पुन्हा आघाडी मिळवून दिली. मात्र भारताकडून कनिका सिवाचने ४७व्या मिनिटाला सुंदर गोल करत सामन्यात पुन्हा बरोबरी साधली.

सामना २-२ ने संपल्यानंतर शूटआउट घेण्यात आला, ज्यात चिलीने ३-१ असा विजय मिळवला. चिलीकडून जोसेफिना गुटिरेज, इसाबेल मेसेन आणि त्रिनिदाद बैरियॉस यांनी शूटआउटमध्ये गोल केले, तर भारताकडून फक्त सोनमने गोल केला.

भारताने याआधी चिलीविरुद्धच स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात २-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर उरुग्वेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात ३-२ अशी बाजी मारली. तिसऱ्या सामन्यात यजमान अर्जेंटिनाविरुद्ध १-१ ची बरोबरी झाल्यानंतर शूटआउटमध्ये ०-२ असा पराभव झाला.

भारताचा पुढील सामना रविवारी उरुग्वेविरुद्ध होणार आहे.

Exit mobile version