आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यावर धीम्या ओव्हर-रेटमुळे १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात हा नियमभंग झाल्याने आयपीएल प्रशासनाने ही कारवाई केली.
आयपीएलने दिलेल्या निवेदनानुसार, कोड ऑफ कंडक्टच्या कलम २.२२ अंतर्गत हा हंगामातील संघाचा पहिला उल्लंघन असल्याने कर्णधारावर दंड आकारण्यात आला.
दरम्यान, सामन्यादरम्यान श्रेयस अय्यर जखमीही झाला. नॉन-स्ट्राइकवर उभा असताना कूपर कोनोलीच्या जोरदार फटक्याने चेंडू अय्यरच्या उजव्या मनगटावर लागला. दुखापत इतकी गंभीर होती की तो क्षणभर मैदानावरच कोसळला. वैद्यकीय उपचारानंतर तो पुन्हा खेळायला आला, मात्र लवकरच बाद झाला.
सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला २० षटकांत ६ बाद १६२ धावांवर रोखले. गुजरातकडून शुभमन गिलने २७ चेंडूत ३९, जोस बटलरने ३३ चेंडूत ३८, तर ग्लेन फिलिप्सने १७ चेंडूत २५ धावा केल्या.
पंजाबकडून विजयकुमार वैशाकने ३ विकेट्स, युजवेंद्र चहलने २, तर मार्को जानसेनने १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरात पंजाबने १९.१ षटकांत ७ बाद १६५ धावा करत सामना ३ विकेट्सने जिंकला. कूपर कोनोलीने नाबाद ७२ धावांची शानदार खेळी करत सामनावीराचा मान पटकावला.
गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने ४ षटकांत २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच रबाडा, अशोर शर्मा, राशिद खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.







