भारताकडून हार, पाकिस्तानला दंड

भारताकडून हार, पाकिस्तानला दंड

आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तान संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सामन्यात निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे (स्लो ओव्हर-रेट) आयसीसीने पाकिस्तान संघाच्या खेाडूंवर सामन्याच्या मानधनाच्या ५ टक्के दंडाची कारवाई केली आहे.

आयसीसीच्या निवेदनानुसार, वेळेची सूट विचारात घेतल्यानंतरही पाकिस्तान संघ निर्धारित लक्ष्यापेक्षा एक षटक मागे आढळला. त्यामुळे आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या नियमानुसार, प्रत्येक अपूर्ण राहिलेल्या षटकासाठी खेळाडूंना सामन्याच्या मानधनाच्या ५ टक्के दंड भरावा लागतो.

मैदानावरील पंच क्लेअर पोलोसाक आणि जॅकलिन विल्यम्स, तिसरे पंच एलोईस शेरीडन तसेच चौथ्या पंच सू रेडफर्न यांनी हा आरोप नोंदवला होता. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने चूक मान्य करून प्रस्तावित दंड स्वीकारल्याने औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही.

सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १७० धावा केल्या. सुरुवातीला दोन विकेट्स लवकर गमावल्यानंतर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी डाव सावरला. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. मंधानाने ४४ चेंडूत ६८ धावांची दमदार खेळी केली, तर हरमनप्रीतने ३६ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये ऋचा घोषने १७ चेंडूत ३४ धावा करत भारताची धावसंख्या १७० पर्यंत पोहोचवली.

१७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १७ षटकांत १०६ धावांवर गारद झाला. मुनीबा अलीने ४१ धावा केल्या, तर आलिया रियाजने १८ धावांचे योगदान दिले. भारताकडून दीप्ती शर्माने १० धावांत ५ बळी घेत सामन्यावर निर्णायक छाप सोडली. श्री चरणीने ३, तर शेफाली वर्माने १ विकेट घेतली.

भारताच्या दमदार विजयासोबतच पाकिस्तानला पराभव आणि दंड अशा दुहेरी फटक्यांना सामोरे जावे लागले.

Exit mobile version