राधा यादवचा ‘डबल धमाका’; भारत-अ ची फायनलकडे दिमाखात वाटचाल!

राधा यादवचा ‘डबल धमाका’; भारत-अ ची फायनलकडे दिमाखात वाटचाल!

एसीसी महिला एशिया कप राइजिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत भारत-अ संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारत-अ ने श्रीलंका-अ संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयाची शिल्पकार कर्णधार राधा यादव ठरली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका-अ संघाची सुरुवात डळमळीत झाली. सलामीवीर संजना काविंदी हिने ३५ धावांची खेळी करत संघाला आधार देण्याचा प्रयत्न केला. तिच्या खेळीत ५ चौकारांचा समावेश होता. शशिनी गिम्हानी हिने १७ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. परिणामी श्रीलंका-अ संघ १९.४ षटकांत ११८ धावांवर गारद झाला.

भारत-अ कडून कर्णधार राधा यादव हिने प्रभावी गोलंदाजी करत ३.४ षटकांत १९ धावा देत ४ महत्त्वाचे बळी घेतले. प्रेमा रावत हिनेही अचूक मारा करत ४ षटकांत केवळ ९ धावा देत २ बळी मिळवले.

११९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत-अ ची सुरुवात समाधानकारक झाली नाही. नंदिनी कश्यप १३ धावांवर बाद झाली. त्यानंतर अनुष्का शर्मा आणि वृंदा दिनेश यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. अनुष्का हिने १८ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या, तर वृंदा हिने २० चेंडूंमध्ये ४२ धावांची आक्रमक खेळी साकारली.

गोलंदाजीत चमक दाखवल्यानंतर राधा यादव हिने फलंदाजीतही मोलाचे योगदान दिले. तिने १८ चेंडूंमध्ये ७ चौकारांच्या सहाय्याने नाबाद ३१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. तिच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल तिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

स्पर्धेचा अंतिम सामना २२ फेब्रुवारी रोजी होणार असून बांगलादेश-अ आणि पाकिस्तान-अ यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी भारत-अ ची लढत होणार आहे.

Exit mobile version