आयसीसीने मार्च २०२६ साठी ‘मेन्स प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी भारताचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज कॉनर एस्टरहुइजन यांची नामांकन यादी जाहीर केली आहे.
टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत संजू सॅमसनने उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेच्या सुरुवातीला संधी न मिळाल्यानंतर सुपर-८ फेरीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात त्याने नाबाद ९७ धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध ८९ धावा आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्धही ८९ धावा करत त्याने संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. स्पर्धेत ५ सामन्यांत ३२१ धावा करत सॅमसनला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कारही मिळाला.
जसप्रीत बुमराहनेही विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यांमध्ये प्रभावी गोलंदाजी केली. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्याने एक बळी घेतला, तर अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ४ षटकांत १५ धावा देत ४ बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीबद्दल त्याला अंतिम सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले.
दुसरीकडे, कॉनर एस्टरहुइजनने विश्वचषकानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी करत लक्ष वेधले. त्याने ५ सामन्यांत २०० धावा केल्या. मालिकेतील चौथ्या सामन्यात ३३ चेंडूत ७५ धावांची खेळी करत त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिले टी२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक नोंदवले. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने ३-२ असा विजय मिळवला. एस्टरहुइजनला दोन सामन्यांत ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला असून, त्याचा फायदा त्याच्या टी२० क्रमवारीतही झाला आहे. तो सध्या फलंदाजांच्या यादीत ३९व्या स्थानावर आहे.
या तिघांपैकी कोणाला ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार मिळणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.







