अनाहत सिंह इतिहास रचण्यापासून अवघे एक पाऊल दूर

२१ वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक

अनाहत सिंह इतिहास रचण्यापासून अवघे एक पाऊल दूर
भारताची स्टार स्क्वॅशपटू अनाहत सिंह हिने जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये (World Junior Squash Championship) इतिहास रचण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. उपांत्य फेरीत इजिप्तच्या बारब सामेह हिचा चार गेम रंगलेल्या लढतीत पराभव करत अनाहतने अंतिम फेरीत धडक मारली. यासह तब्बल २१ वर्षांनंतर या प्रतिष्ठित स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
जोशना चिनप्पाच्या विक्रमाची पुनरावृत्ती
शीर्ष मानांकित अनाहत सिंह हिच्या आधी २००५ मध्ये भारताची दिग्गज खेळाडू जोशना चिनप्पा हिने जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता २१ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अनाहतने ही कामगिरी केली आहे.
उपांत्य फेरीत अनाहतने ३/४ मानांकित इजिप्तच्या बारब सामेह हिचा ११-३, ८-११, ११-४, ११-६ असा पराभव केला. अनाहतने सामन्याची धडाकेबाज सुरुवात करत पहिला गेम ११-३ असा सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये बारबने वापसी करत ११-८ अशी बाजी मारली आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला. मात्र, त्यानंतर भारतीय खेळाडूने आक्रमक खेळ करत पुढील दोन्ही गेम ११-४, ११-६ असे जिंकत अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले.

“माझे कुटुंब आणि प्रशिक्षक खूप खूश आहेत” “मी ब्रिटिश ज्युनियर ओपनमध्ये बारबविरुद्ध खेळले होते, त्यामुळे ही लढत कठीण असेल याची मला कल्पना होती. मी याआधी चार जागतिक ज्युनियर स्पर्धा खेळल्या असून उपांत्य आणि उपांत्यपूर्व फेरीत माझे आव्हान संपले होते. त्यामुळे फायनलमध्ये पोहोचल्याचा माझ्या पालकांना आणि प्रशिक्षकांना प्रचंड आनंद आहे. मात्र, स्पर्धा अजून संपलेली नाही.”

— अनाहत सिंह, भारतीय स्क्वॅशपटू

सुवर्णपदकासाठी इजिप्तच्याच रुकैया सलेमशी लढत
आता ऐतिहासिक विजेतेपदासाठी अंतिम सामन्यात अनाहतसमोर इजिप्तच्याच दुसऱ्या मानांकित रुकैया सलेमचे आव्हान असणार आहे. रुकैयाने दुसऱ्या उपांत्य फेरीत आपल्याच देशाच्या मलिका एलकाराक्सीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
शनिवारी होणाऱ्या या महाअंतिम सामन्यात इजिप्तच्या खेळाडूला नमवून जागतिक ज्युनियर स्क्वॅश स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरण्याची सुवर्णसंधी अनाहत सिंहकडे असणार आहे.
Exit mobile version