भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा!

भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा!
‘एफआयएच युथ हॉकी5एस एशियन चॅम्पियनशिप २०२६’ स्पर्धेत भारतीय सब-ज्युनिअर पुरुष संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय मुलांनी पहिल्या सामन्यात यजमान ओमानचा १०-१ असा धुव्वा उडवल्यानंतर, दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७-३ असा दणदणीत पराभव केला. दुसरीकडे, भारतीय सब-ज्युनिअर महिला संघाला मात्र कडवी झुंज देऊनही चीनकडून ३-६ असा पराभव स्वीकारावा लागला.
पाकिस्तानविरुद्ध भारताचे वर्चस्व
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मिळवली. मध्यंतरापर्यंत (हाफ टाईम) भारताने ३-० अशी मजबूत आघाडी घेतली होती. भारताकडून पहिल्या सत्रात रोमित पाल (८ व्या मिनिटाला), करण गौतम (१० व्या मिनिटाला) आणि कर्णधार केतन कुशवाहा (१० व्या मिनिटाला) यांनी गोल नोंदवले.
उत्तरार्धात (दुसऱ्या हाफमध्ये) प्रल्हाद राजभरने गोल करत भारताची आघाडी ४-० अशी वाढवली. यानंतर पाकिस्तानच्या मोहम्मद उस्मान आणि कर्णधार अदिलने गोल करत पुनरागमनाचा प्रयत्न केला; मात्र शाहरुख अली, राहुल यादव आणि कर्णधार केतन कुशवाहा यांनी पुन्हा गोल डागत भारताचा ७-३ असा सोपा विजय निश्चित केला.
ओमानविरुद्ध गोलचा पाऊस
याआधी झालेल्या सामन्यात भारतीय पुरुषांनी यजमान ओमानला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. मध्यंतरापर्यंत भारताने ६-० अशी एकतर्फी आघाडी घेतली होती. या सामन्यात शाहरुख अली आणि कर्णधार केतन कुशवाहा यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर करण गौतम आणि प्रल्हाद राजभर यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताने हा सामना १०-१ अशा फरकाने जिंकला. ओमानकडून एकमेव गोल खजराज सुबैत याने २० व्या मिनिटाला केला.
महिला संघाची झुंज अपुरी
महिलांच्या गटात भारतीय सब-ज्युनिअर संघाला चीनविरुद्ध ३-६ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. भारताकडून संदिप कुमार हिने पहिला गोल करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर किरण एक्का हिने सलग दोन गोल करत भारताला मजबूत स्थितीत आणले.
मात्र, चीनच्या गुओ जियाक्सिन, गे चेन आणि लू टोंगटोंग यांनी शानदार खेळ करत मध्यंतरापर्यंत ३-३ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या सत्रात चीनच्या गुओ जियाक्सिनने आपली हॅटट्रिक पूर्ण करत सामना भारताच्या हातातून हिरावून घेतला.
Exit mobile version