भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कमजोर पंतप्रधान आहेत, असा दावा भारताचे आईनस्टाईन उर्फ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला आहे. अमेरिकेने एच १ बी व्हीसाबाबत जाहीर केलेले नवे धोरण हे या ताज्या दाव्याचे कारण आहे. ज्यांच्या खानदानाने या देशातील उगवत्या टॅलेंटला सडवले, या देशात आपले काही भले होणार नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण केली. देशात एखादी कंपनी उभी करण्यापेक्षा एच १ बी व्हीसा घेऊन अमेरिकेची चाकरी करायला, तिथेच स्थायिक व्हायला भाग पाडले. हे सगळे काँग्रेसचे कर्त्वुत्त्व. मोदींच्या तथाकथित कमजोरीचा दावा करणाऱ्यांच्या या कर्त्वुत्वाचा उहापोह घेणे गरजेचे आहे. त्या शिवाय कमजोरी म्हणजे नेमकी काय भागगड असते, हे लक्षात येणार नाही. एच १ बी व्हीसाबाबत अमेरिकेचे नवे धोरण या नव्या गदारोळाला कारणीभूत ठरले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच१बी व्हीसावर १ लाख डॉलरची फी आकारल्यानंतर देशात खळबळ माजली. ती स्वाभाविक होती. परंतु नंतर टप्प्या टप्प्याने याचा तपशील बाहेर आला. ज्यांच्याकडे सध्या व्हीसा आहे त्यांना ही फी भरायला लागणार नाही. व्हीसाच्या नुतनीकरणासाठीही नाही. यापुढे जे लोक एच१ बी व्हीसासाठी अर्ज करतील त्यांच्यासाठी हा नियम आहे. त्यातही संरक्षण, सायबर सेक्युरीटी, आरोग्य, आदी राष्ट्रीय महत्वाच्या प्रकल्पांवर काम करणाऱ्यांना सुट देण्यात आली आहे. एच१ बी व्हीसावर असलेले जे लोक देशाबाहेर आहेत, त्यांनी २४ तासांत अमेरिकेत परतावे, या अटीमुळे तर मायदेशी आलेले लोक हादरले. त्यांची प्रचंड तारांबळ झाली, परंतु पुढे अशी काही अट नसल्याचे व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले.
