द डे द क्लोन डाईड, हा सिनेमा १९७२ मध्ये येऊ घातला होता. ज्यूंचा नरसंहार हा त्या सिनेमाचा विषय होता. त्याचा ट्रेलर रिलीज झाला. परंतु हा सिनेमा कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. काही देश बुडव्यांनी लडाखमध्ये जो जेन-जीचा ट्रेलर दाखवला आहे, तेच देशभरात करण्याचा त्यांचा मनसुबा असला तरी ते होणे नाही. जे काही लडाखमध्ये झाले आहे, ते देशवासियांसाठी खाड्कन डोळे उघडणार आहे. कट कसे शिजवले जातात, त्यासाठी किती पूर्व तयारी करावी लागते हे जाणून घ्यायचे असेल तर लडाखच्या या उदाहरणाचे विच्छेदन करणे गरजेचे आहे. पेटवापेटवी करणाऱ्यांना नेहमी भुसभुशीत जमीन शोधावी लागते. केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरचे त्रिभाजन केले. लडाखला केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर केले. गुप्तचर यंत्रणांना याची कुणकुण होती की, येत्या काही काळात लडाख पेटवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. चीनने लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात मोहरे पेरले आहेत. त्यांनी कुरापती सुरू केलेल्या आहेत. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, इथल्या पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी सोनम वांगचुक हे लोकप्रिय व्यक्तिमत्व मैदानात उतरवण्यात आले. विदेशातून जेव्हा एखाद्या देशाला अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जातात. त्याची पूर्व तयारी किती आधीपासून केली जाते पाहा. एखाद्याला हेरायचे, त्याला नोबेल, मॅगासेसे पुरस्कार देऊन गौरवायचे. देशविदेशात त्याच्या भाषणांचे आयोजन करायचे, त्याच्या व्यक्तिमत्वाला एक चमक मिळवून द्यायची. हेच बांगलादेशात करण्यात आले. मोहमद युनूस यांना मायक्रो फायनान्समध्ये केलेल्या कामासाठी आधी नोबेल दिले, त्यानंतर त्यांचा बांगलादेशात सत्ता पालटासाठी वापर करण्यात आला.
