अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ धोरणाची कडवट फळे आता दिसू लागली आहेत. चार महिन्यांपूर्वी जे.पी.मॉर्गन या नामांकीत वित्तसंस्थेने दिलेला इशारा खरा ठरतो आहे. अमेरिकेचे अर्थकारण मंदावत असल्याच्या खूणा दिसू लागल्या आहेत. फक्त संकेत नाहीत, आता आकडे बाहेर येतायत. ट्रम्प मात्र हे मान्य करायला नाही. रोजगाग घटल्याचे चुकीचे आकडे दिल्याचा ठपका ठेवून त्यांना एका महिला अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढले. भारताच्या मंत्र्यांनीही ट्रम्प यांना वाईट शब्दात झोडायला सुरूवात केली आहे. अमेरिकेसमोर जिथे जपान, ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियनसारखे देश शस्त्र टाकत असताना भारताला इतका आत्मविश्वास आलाय कुठून? असा प्रश्न अनेकांना पडलाय. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल हे तसे नेमस्त नेते मानले जातात. कामापुरते बोलणे आणि नेमके बोलणे ही त्यांची खासियत. परंतु शनिवारी एका मुलाखतीत आपल्याकडे भिजवून भिजवून जोडे मारण्याची क्षमताही आहे, हे त्यांनी सिद्ध केले. भारत कोणासमोर झुकणार नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी पुनरुच्चार केलाच, शिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत आम्ही अधिक निर्यात करू असे त्यांनी ठणकावून सांगितले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेला तिखट शब्दात झोडले आहे.
