न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफी याने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बळी घेण्याचा विक्रम करत इतिहास रचला आहे. डफीने २०२५ या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ८० बळी घेतले असून, यासह त्याने दिग्गज रिचर्ड हॅडली यांचा ४० वर्ष जुना विक्रम मोडीत काढला.
रिचर्ड हॅडली यांनी १९८५ साली न्यूझीलंडसाठी ७९ बळी घेतले होते. याआधी डॅनियल विटोरी यांनी २००८ मध्ये ७६, तर ट्रेंट बोल्ट यांनी २०१५ मध्ये ७२ बळी घेतले होते.
३१ वर्षीय जेकब डफीने बे ओव्हल येथे झालेल्या वेस्टइंडीजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने ३५ षटकांत ८६ धावा देत ४ बळी घेतले, तर दुसऱ्या डावात २२.३ षटकांत ४२ धावा देत ५ बळी मिळवले. या सामन्यात न्यूझीलंडने वेस्टइंडीजवर ३२३ धावांनी विजय मिळवत मालिका २-० ने जिंकली.
वेस्टइंडीजविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत डफीने एकूण २३ बळी घेतले. क्राइस्टचर्चमधील पहिल्या सामन्यात त्याने ८, तर वेलिंग्टनमधील दुसऱ्या सामन्यात ६ बळी मिळवले होते. संपूर्ण मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
दरम्यान, भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनी डफीच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
अश्विन म्हणाले, “जेकब डफी एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून घडतो आहे. २०२५ हे वर्ष त्याच्यासाठी यशस्वी ठरले. वेस्टइंडीजविरुद्ध १५.४३ च्या सरासरीने, ४०.३ स्ट्राइक रेटने २३ बळी घेणं ही मोठी कामगिरी आहे. तो सध्या जगातील नंबर वन टी-२० गोलंदाज आहे. ३१ व्या वर्षी तो आपल्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. आरसीबीने त्याला २ कोटींच्या बेस प्राइसला घेऊन खूप चांगला निर्णय घेतला आहे.”







