छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात माओवाद्यांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सघन शोधमोहीमेदरम्यान माओवाद्यांनी जमिनीखाली लपवून ठेवलेला अवैध शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्याचा मोठा साठा सुरक्षा दलांनी उघडकीस आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे उसूर हद्दीतील कर्रेगुट्टा टेकड्यांमधील डोलीगुट्टा शिखर परिसरात कोब्रा २०४ आणि सीआरपीएफ १९६ यांच्या संयुक्त पथकाने एफओबी ताडपाला खोऱ्यातील दाट जंगलात सघन शोधमोहीम राबवली. यावेळी डोलीगुट्टा शिखर परिसरातील संशयित ठिकाणी खोदकाम केले असता, माओवाद्यांनी लपवून ठेवलेली शस्त्र दुरुस्तीची सामग्री, बीजीएल सेल निर्मितीसाठी वापरली जाणारी साधने तसेच स्फोटक उपकरणे जप्त करण्यात आली.
या कारवाईदरम्यान माओवाद्यांनी लावलेले दोन प्रेशर आयईडीही आढळून आले, जे सुरक्षा दलांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने बसवण्यात आले होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोब्रा २०४ च्या बॉम्बनिरोधक पथकाने सतर्कता बाळगून हे दोन्ही प्रेशर आयईडी सुरक्षितरीत्या घटनास्थळीच निष्क्रिय केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जप्त केलेल्या साहित्यामध्ये हँड फ्लाय प्रेस, मोठ्या प्रमाणात बीजीएल सेल (मोठे, मध्यम व लहान आकार), बीजीएल टेल, स्टील प्लेट्स, स्क्रू ड्रायव्हर, हॅक्सा ब्लेड, प्लायर तसेच शस्त्र दुरुस्तीसाठी वापरली जाणारी अनेक जड उपकरणे यांचा समावेश आहे. यावरून माओवादी या परिसरात दीर्घकाळासाठी कारवाया राबवण्याच्या तयारीत होते, हे स्पष्ट होते.
हेही वाचा..
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी बेमिसाल ठरले वर्ष
राज्यात रस्ता अपघातांतील मृत्युदरात घट
भाविकांना अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी आल्याचे आत्मिक समाधान मिळावे
ओडिशात वनरक्षकांसाठी १२ कोटींची ‘थार’
सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, सुरक्षा दलांची सतर्कता, परस्पर समन्वय आणि जलद कारवाईमुळे माओवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात आला आहे. ही जप्ती माओवाद्यांसाठी मोठा धक्का असून, परिसरात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सदर भागात सुरक्षा दलांची शोधमोहीम सातत्याने सुरू असून, आणखी पथकेही तैनात करण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, माओवाद्यांबाबत कोणतीही माहिती असल्यास ती तात्काळ सुरक्षा यंत्रणांना कळवावी.







